लसीकरणासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात; कर्मचाऱ्यांचा मात्र तपासच नाही..!

| पुणे | भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत असते.आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांनाही आला. निमित्त होते पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे.आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.४ मे) सर्वत्र सामाजिक माध्यमातून उद्या बुधवार दिनांक ५ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भिगवण येथे लसीकरण होणार असल्याचा संदेश सर्वत्र फिरत होता. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या दहा च्या वेळेपूर्वीच नागरिक लसीकरण केंद्रात हजर झाले. मात्र पाहतात तर काय….१० वाजून गेले तरी लसीकरण केंद्रात ना वैद्यकीय अधिकारी… ना कर्मचारी… ना परिचारिका….ना शिपाई… कोणीच हजर नव्हते. जवळपास शे-दीडशे नागरिक त्या ठिकाणी जमल्यामुळे सर्वत्र गोंधळ सुरु झाला आणि ही परिस्थिती पाहून एकाने एका दैनिकाच्या पत्रकाराला फोन केला. त्यांनी त्या ठिकाणी येऊन वस्तुस्थिती पाहिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील गावडे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना संपर्क साधला. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांनाच उलट उत्तरे दिल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना फोन करून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर चक्रे वेगाने फिरली आणि सुमारे सव्वादहानंतर एक एक कर्मचारी धावत पळतच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येऊ लागला. तोपर्यंत उपस्थित नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला होता.

अखेर नागरिकांचा संताप पाहून पोलिसांना त्याठिकाणी हस्तक्षेप करण्याची वेळ आली.भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने , पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील आणि पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी नागरिकांना शांत करून गर्दी पांगवून कामकाजाला सुरुवात केली. सर्वांची नोंद घेऊन झाली तरी लस घेऊन येणारी गाडी आली नव्हती.अखेर केंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांनी सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले. आणि मग गर्दी पांगली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा नागरिक हळूहळू प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येऊ लागले आणि सर्वांना लसीकरण करण्यात आले. मात्र या सर्व प्रक्रियेत नागरिकांना झालेल्या त्रासामुळे सर्वांनी संताप व्यक्त केला. याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत जाधव यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी नागरिकांनाच आरोग्य कर्मचाऱ्यांना सांभाळून घेण्याचा सल्ला दिला.

दिनांक १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू होणार असल्यामुळे जवळपास दि.२५ एप्रिल पासूनच लसीकरण बंद करण्यात आले होते. तेव्हापासून मंगळवार (दि.४ मे)पर्यंत लस उपलब्ध झाली नाही. आज अखेर ४५ वर्षावरील नागरिकांनाच पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. यावेळी बहुतांश सरकारी विविध विभागांचे कर्मचारी आपला उर्वरित दुसरा डोस घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दिसून आले. मात्र फक्त दोनशे जणांना पुरेल एवढीच लस उपलब्ध असल्यामुळे बाकीच्यांची निराशाच झाली. त्यांना लसीकरणाविनाच परत माघारी फिरावे लागले असे दृश्य दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published.