“लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही” ; भाजप आमदाराचा योगी सरकारला घरचा आहेर…!

| लखनऊ | उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना व्यवस्थापनावर भारतीय जनता पक्षाचे आमदारच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यातील परिस्थिती भीषण असून मदतीसाठी येणाऱ्यांना उपचारदेखील पुरवता येत नसल्याची पत्रं अनेक आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवली आहेत. लखनऊ मध्यचे आमदार आणि मंत्री बृजेश पाठक यांनी सर्वप्रथम अशा प्रकारचं पत्र आदित्यनाथ यांना लिहिलं होतं. आता लखीमपूर खिरीचे आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून असहायता व्यक्त केली आहे.

लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा कहर थांबत नाहीए. आम्ही असहायपणे आपल्या माणसांना मरताना बघत आहोत. कोरोनाच्या संकटापासून एकही गाव वाचलेलं नाही, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. लखीमपूरमध्ये ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कित्येकांचा जीव जातोय. तहसील स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रावर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असं आमदारांनी पत्रात पुढे नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *