माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंगांचे खळबळजनक आरोप, सचिन वाझेंसह गृहमंत्री अनिल देशमुख टार्गेट..!

| मुंबई | सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून आता राज्यातलं वातावरण तापलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून “कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा आरोप केला”, असं ट्वीट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

परमबीर सिंग यांनी लिहिलेलं तीन पानांचं पत्र समोर आलं असून त्यामध्ये अनेक मुद्दे परमबीर सिंग यांनी मांडले आहे. “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं”, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

पान १

पान २

पान ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *