| भन्नाट कल्पना | खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेमार्फत फक्त १०१/ रुपयांमध्ये मिळणार गणपती मूर्ती..!

| कल्याण | हिंदू धर्मात सण उत्सवाला मोठे महत्व आहे. माणूस कितीही गरीब असला तरी तो वर्षातून येणारे सण उत्सव आनंदाने साजरे करत असतो. काही वेळा त्यासाठी उसनवारी वा कर्ज देखील घेतो, पण सण साजरे करतो. एकंदरीत ऋण काढून सण साजरे करण्याची प्रथा आजही कायम आहे. कोरोना काळात लॉकडाऊन व बेरोजगारीमुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. आर्थिक संकट असतानाही घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या डोंबिवलीकरांच्या मदतीला पुन्हा शिवसेना उभी राहणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व डोंबिवली शिवसेना शाखा यंदा गरीब कुटुंबांना पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती अवघ्या १०१ रुपयात देण्याचा अनोखा उपक्रम राबवणार आहे.

कोविडच्या वैश्विक साथीच्या प्रादुर्भावामुळे व टाळे बंदीमुळे व्यापार, व्यवसाय, नोकरी-धंदा सगळ्यावरच परिणाम झाला आहे. परिणामी अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. ते कमी म्हणून काहींना नैसर्गिक आपत्तींनाही तोंड द्यावे लागले आहे. अशाही परिस्थितीत आपल्या हिंदु प्रथा परंपरे प्रमाणे घरगुती गणेशोत्सव साजरा करावाच लागणार आहे. आपल्या हिंदु सणांचे महात्म्य आणि महत्व लक्षात घेता कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डोंबिवलीकर कुटुंबियांना घर गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद घेता यावा, या हेतूने एक सामाजिक बांधिलकी म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्यावतीने यंदा पर्यावरणपूरक शाडूच्या व कागदाच्या लगद्याच्या गणपतीच्या ५०० मूर्ती श्री सेवा म्हणून अगदी नाममात्र अशा १०१ रुपये किंमतीत देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सध्या बाजारात ८ ते १२ इंच उंचीच्या मूर्तीची किंमत १२०० ते १५००, १२ ते १५ इंच उंचीच्या मूर्तीची किंमत १५०० ते २००० व १५ ते २४ इंच उंचीच्या मूर्तीची किंमत ३००० ते ४५०० रुपये आहे. मात्र प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वाने या मूर्ती दिल्या जाणार आहेत. आपली मूर्ती आरक्षित करण्यासाठी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखा वा आपल्या नजिकच्या कुठल्याही शिवसेना शाखेत त्वरित संपर्क करा, असे आवाहन शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *