मोठी बातमी : आता खाजगी रुग्णालयात देखील लस मिळणार, केंद्र सरकारचा हिरवा कंदील

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लसीकरण मोहिमेत सहभागी होत नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर देशभरात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेला वेग आलाय. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत कोविन या सरकारी पोर्टलवर ५० लाखांहून अधिक जणांनी नावनोंदणी केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग कायम राखण्यासाठी सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतलाय.

सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणाऱ्या कोणत्याही खासगी रुग्णालयांला कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केल्याप्रमाणे, कोणतंही खासगी रुग्णालय कोरोना लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय.

खासगी रुग्णालयांना करोना लस देण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कर्मचारी, लाभार्थ्यांच्या देखरेखीसाठी योग्य व्यवस्था, लसीच्या देखभालीसाठी कोल्ड चैन तसंच लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम समोर आले तर त्यावर उपचार पुरवण्याची योग्य व्यवस्था असणं आवश्यक आहे.

मंत्रालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारला लसीकरण मोहिमेत तीन आरोग्य योजनांच्या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या आणि निर्धारित नियमांचं पालन करणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी योजनांमध्ये आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAYE), केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS) आणि राज्य आरोग्य विमा योजना यांचा समावेश आहे.

लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत २६०००-२७००० रुग्णालयांचा समावेश करण्यात आलाय. यातील जवळपास १२५०० रुग्णालय खासगी क्षेत्रातील आहेत.

सोमवारपासून सुरू झालेल्या कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लस दिली जाणार आहे. तसंच ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या परंतु गंभीर आजारांना तोंड देत असलेल्या व्यक्तींनाही करोना लस दिली जाणार आहे.
मंगळवारी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत एकूण १ कोटी ५४ लाख ६१ हजार ८६४ डोस दिले गेले आहेत. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६ लाख ०९ हजार ८४५ जणांना कोरोना लस देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *