एमपीएससी परीक्षेत भाजप धार्जिणे प्रश्न..? यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन यशोमती ठाकूर यांनी दिले.

काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सदर मागणी केली आहे.

यासंदर्भात एक निवेदन ठाकूर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. दरवर्षी लाखो विद्यार्थी MPSC स्पर्धा परीक्षेला बसतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

भाजप प्रचार आणि संघीकरण रोखा

MPSC परीक्षेचे संघीकरण करण्यात येत असून, परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपधार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता. तसेच याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे, असे यशोमती ठाकूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सदर राजकीयीकरणाला MPSC अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे, तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता या निवेदनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट असतानाही MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोठे आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं होतं. तब्बल आठ तास पुण्यातील प्रमुख असलेला लाल बहादूर शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवून ठेवला होता. त्यानंतर या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *