मुलीच्या वाढदिवशी १० मुलांना दिले शिक्षणरूपी गिफ्ट..! दानशूर व्यावसायिक बाळासाहेब पिंजण यांचा विधायक उपक्रम..!

| पुणे | हिंजवडी ता. मुळशी येथील व्यावसायिक बाळासाहेब पिंजण यांनी त्यांची मुलगी स्वरा हीच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील दहा मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. बाणेर नागरी पतसंस्थेच्या हिंजवडी शाखेचे उपाध्यक्ष व व्यावसायिक असलेले श्री. बाळासाहेब पिंजण वेळोवेळी गरजू व होत करू मुलांना शैक्षणिक मदत करत असतात. दरवर्षी मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक मदत करत असतात.

या वर्षी श्री. पिंजण यांची कन्या स्वरा हीच्या वाढदिवसानिमित्त मुळशी तालुक्यातील कातरखडक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुबांतील १० मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा संकल्प त्यांनी घेतला त्यानुसार या मुलांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या रकमेचा धनादेश कातरखडक शाळेचे उपक्रमशिल शिक्षक श्री. अरुण महादेव घोळवे यांना हिंजवडीचे माजी उपसरपंच श्री. तानाजी हुलावळे यांच्या हस्ते सुपुर्त करण्यात आला.

दुर्गम भाग असलेल्या कातरखडक जिल्हा परिषदेच्या शाळेतील आपले पालक गमावलेल्या तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या मुलांना सहकार्य करायला हवे या सामाजिक जाणिवेतून हे पालकत्व स्विकारले असल्याचे श्री. बाळासाहेब पिंजण यांनी म्हटले आहे.

अनेक विद्यार्थांना मदतीची गरज असून सर्वांनी पुढे येवून अशा विदयार्थांना एक सामाजिक जबाबदारी म्हणून मदत केली पाहीजे, श्री पिंजण यांचे कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन हिंजवडीचे माजी सरपंच श्री. तानाजी हुलावळे यांनी केले आहे. सर्व मुलांच्या वतीने श्री. पिंजण यांचे आभार श्री. अरुण घोळवे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *