मुंबई सेंट्रल चे नाव होणार नाना शंकरशेठ टर्मिनस..!

| मुंबई | महाराष्ट्रात सध्या नामांतराच्या मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनस’चे ‘नाना शंकरशेट टर्मिनस’ असे नामकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसंच, याबाबत सकारात्मक पत्रदेखील गृहराज्यमंत्र्यांनी अरविंद सावंत यांना लिहलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर केला. मंजूर केल्यानंतर तुमच्याकडून फक्त प्राथमिक मान्यता मिळणं गरजेचं आहे. ती अजून मिळालेली नाही त्यामुळं आपण तातडीने लक्ष घालावं, असं मी गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं होतं. यावर त्यांनी मला आज उत्तर पाठवलं असून त्यांनी नामांतराची प्रक्रिया सुरु असून लवकरच मान्यता देऊ असं म्हटलं आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

भारतातील पहिल्या रेल्वेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नाना शंकरशेठ यांनी अथक प्रयत्न केले. प्रसंगी स्वतःचा वाडा रेल्वे कार्यालयासाठी देऊ केला होता. त्यामुळे तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांचा यथोचित सन्मान करुन रेल्वेचा सोन्याचा पास दिला. तसंच, मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील दर्शनी भिंतीवर नानांचा पुतळा बसविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *