नागपूर माझा मतदारसंघ, संधी दिली असती तर जिंकून दाखवली असती; नितीन राऊतांनी मौन सोडलं ………….

आशिष कुडके :- नागपूर : मला नागपुरातून  संधी दिली असती तर मी नक्की निवडणूक लढवली असती  आणि जिंकूनही दाखवली असती, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत  यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

त्यामुळे  नितीन राऊत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करत असले तरी नितीन राऊत यांच्या मनामध्ये ही नागपुरातून निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा होती हे आता समोर आले आहे.

 गडकरींचा पाच लाख मताधिक्यांचा दावा दिवास्वप्नच ठरेल तसेच नागपूरचा गड काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही असे देखील  नितीन राऊत म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.   

नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी मिळाली आहे. नागपूर माझा मतदारसंघ आहे त्यामुळे माझी मानसिक तयारी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची होती.  रामटेक ची जागा मी कधीच मागितली नव्हती, असे स्पष्टीकरण देखील   नितीन राऊत यांनी दिले आहे.

गडकरींचा पाच लाख मताधिक्यांचा दावा दिवास्वप्नच : नितीन राऊत

 

दरम्यान, भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपुरातून पाच लाखांच्या मताधिक्याने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. मात्र, पाच लाखांचा मताधिक्य नितीन गडकरी आणणार कुठून असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे. 2014 च्या तुलनेत त्यांचं 2019 चा मताधिक्य आधीच कमी झालेला आहे.

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर या दोन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने भाजपकडून हिसकावले आहे. तर मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूर मध्ये भाजपचा मताधिक्य आणखी कमी करून दाखवला आहे.  त्याशिवाय पदवीधर मतदार संघाची निवडणूक तसेच शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही काँग्रेसने जिंकली आहे.  त्यामुळे गडकरींचा पाच लाख मताधिक्यांचा दावा दिवास्वप्नच ठरेल असे राऊत म्हणाले.

नागपुरात कुठलाही विकास नितीन गडकरींच्या काळात झालेला नाही : नितीन राऊत

 

 

गडकरी उत्तर नागपूरात तीस हजारांच्या मताधिक्याचा दावा करत असले तरी उत्तर नागपुरात यंदा काँग्रेस किमान 50 हजारांचा मताधिक्य घेईल अशी स्थिती आहे. नागपूरातील मोजक्या भागाचा विकास करणे म्हणजेच सर्वसमावेशक विकास नाही. नागपुरातील अनेक भागात कुठलाही विकास नितीन गडकरींच्या काळात झालेला नाही असा आरोप ही नितीन राऊत यांनी केला. 

नागपूरचा गड काँग्रेसच जिंकणार : नितीन राऊत

 

गडकरी यांनी नाग नदीमध्ये नाव चालवण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र जेव्हा नागपूरात  महापूर आला तेव्हा रस्त्यावर नाव चालली हे लोकांनी पाहिले असल्याची कोपरखळी ही त्यांनी मारली. काँग्रेस यंदा एकमनाने भाजप विरोधात लढत आहे. नागपुरात काँग्रेस जोमाने लोकसभा निवडणूक लढत असून नागपूरचा गड काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही असा दावा ही राऊत यांनी केला.  

आम्ही सर्वांनी मिळूनच नागपूरचा उमेदवार म्हणून विकास ठाकरे यांचा नाव निश्चित केला आहे.  मात्र, रामटेक मध्ये उमेदवार निवडताना जे काही झालं आणि त्यानंतर त्या उमेदवाराच्या जात वैधता प्रमाणपत्र बद्दल जे काही घडलं, त्याबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही. त्याबद्दल मला विचारूही नका असेही नितीन राऊत म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *