| रत्नागिरी | माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. त्यांनी त्यांचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडू नये, अशी टिप्पणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर पत्रकारांशी प्रतिक्रिया व्यक्त करताना, माझी सुरक्षा काढून घेतल्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. केंद्र सरकारने माझ्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे -वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा दिला.
त्याकडे लक्ष वेधले असता खासदार राऊत म्हणाले की, राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे. राणेंचे राजकारणात वलय आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आम्हीसुद्धा कधी एकेरी बोलत नाही. पण निलेश राणेंची भाषा असभ्य असते. खर तर राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व उपलब्ध होते. पण दोघांनाही त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला नाही. नीलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. नीलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल. असे वाटले होते परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत राणेंच्या राजकीय अस्तित्वाला खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे.