| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होत आहे. या मागणीवरून सध्या वाद होत आहे.
शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी दृष्टीपथात दिसत नसली तरी नामांतरावरून मात्र वाद निर्माण झाले आहेत. सिडकोच्या माध्यमातून तयार केले जात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सरकारने बाळासाहेब ठाकरे नाव दिले आहे. या नामांतराला भाजपने विरोध केला असून स्थानिक प्रकल्पग्रस्त दिवंगत नेते दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यासाठी 10 जूनला मानवी साखळी करून सरकारचा निषेध केला आहे. परंतु यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे या आंदोलनात सहभागी झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोधाची तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
सध्या गाजत असलेल्या या विषयावर पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यात आमदार राजू पाटील विरोधी भूमिका घेतल्याने मनसेचा बाळासाहेबांच्या नावाला विरोध असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसे नसेल तर पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे, असा सूर दिसून येत आहे.
भाजपचे प्रेम बेगडी..?
शिवसेनेने दि बा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांचा पराभव करण्याचे काम येथील काही नेत्यांनी केले आहे. आज तेच नेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह करीत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र आणि देशातील मानबिंदू आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भाजपचे दि बा पाटील यांच्यावरील प्रेम हे बेगडी असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना स्वतःसाठी भूखंड काढून घेण्यात त्यांनी रस दाखवला. मात्र, त्याचवेळी दि बा पाटील यांच्या नावाचा ठराव सिडकोत का पास केला नाही असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.