नवलच : आमदार भाजपचे आणि त्यांच्या कंपनीचा ५ कोटींचा निधी राष्ट्रवादीला..

| मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच चांदी झाली आहे. राज्यात सत्तेतील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेच पण राष्ट्रवादीच्या गंगाजळीत पाच पटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीला भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडूनही कोट्यवधीची आर्थिक रसद मिळाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला 59.94 कोटीचा निधी मिळाला होता. गेल्या वर्षी हा निधी 12.05 कोटी रुपये होता. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या योगदानाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला 5 कोटींचा निधी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘द प्रिंट’ने या बाबतचे वृत्त दिलं आहे. प्रत्येक वर्षी राजकीय पक्षांना त्यांच्या 20,000 रुपयांच्या योगदानाची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यातून ही माहिती उजेडात आली आहे.

संशय निर्माण करण्याची गरज नाही

लोढा हे भाजपचे पाच वेळा निवडून आलेले आमदार आहेत. सध्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत. ‘मी कंपनीचे थेट व्यवहार पाहत नाही. तुम्हाला कंपनीच्याच व्यक्तीच्या संपर्कात राहून माहिती घ्यावी लागेल’, असं सांगत लोढा यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तर, ‘राष्ट्रवादीला जो निधी मिळतो तो आम्ही घेतो. हा निधी आम्ही पारदर्शकपणे निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्याभोवती संशय निर्माण करण्याची गरज नाही’, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

सत्तेबाहेर असताना राष्ट्रवादीला मदत नाही

यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. हे दोन्ही पक्ष राज्यात ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2014 पर्यंत सत्तेत होते. त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या मदतीने फडणवीस सत्तेत आले. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर असताना लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला कधीच देणगी दिली नाही. वास्तविक राष्ट्रवादीला 2014-15मध्ये देणगी मिळाली होती. त्या वर्षी राष्ट्रवादीला 38,82 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

या शिवाय लोढा ग्रुपची मालकी असलेल्या पलावा ड्वेलर्सनेही 2014-15मध्ये राष्ट्रवादीला 3 कोटींची देणगी दिली होती. विशेष म्हणजे त्यानंतर लोढा ग्रुप आणि त्यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांनी राष्ट्रवादीला आर्थिक रसद पुरवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची गंगाजळीतही फार रक्कम आली नाही.

महापालिका निवडणुकीवेळी मदत

2015-16 मध्ये निवडणूक आयोगाला 20 हजाराच्या देणगीवर राष्ट्रवादीने 71.38 लाख रुपये जाहीर केले होते. 2016-17मध्ये मुंबई, पुण्यासह दहा मुख्य महापालिकांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीला 6.34 कोटी रुपये मिळाले होते. 2017-18 आणि 2018-19 मध्ये राष्ट्रवादीला क्रमश: 2.08 कोटी आणि 12.05 कोटी रुपये मिळाले.

या कंपन्यांकडूनही आर्थिक रसद

लोढा ग्रुप शिवाय इतर अनेक डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला 2019-20मध्ये मोठी देणगी दिली आहे. मागरपट्टा सिटी डेव्हल्पमेंट, कुमार प्रॉपर्टीज, पंचशील कार्पोरेट पार्क, कप्पा रिल्टर्स, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, मॉडर्न रोड मेकर्स आणि पेगासस प्रॉपर्टीज आदींनी राष्ट्रवादीला भरभरून देणगी दिली आहे.

सीरमकडून 3 कोटी

त्याशिवाय अनेक उद्योजकांनी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर देणगी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी 3 कोटींची देणगी दिली आहे. त्याशिवाय फिनोलेक्स इंड्रस्ट्रीज, एमक्युअर फार्मासिटिक्लस, धारीवाल इंडस्ट्री आणि डेम्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनेही मोठी देणगी दिली आहे.

लोढांचे पाच कोटी धर्मांध की धर्मनिरपेक्ष?

बातमी महत्वाची आहे. अर्थात मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये ती दिसली नाही. ‘द प्रिंट’ या पर्यायी माध्यमांनं ती दिली आहे. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रवादीला याच आर्थिक वर्षात तब्बल पाच कोटींची देणगी दिली आहे. उठसूठ सगळ्यांना संघी ठरवणाऱ्या राष्ट्रवादी पत्रकारांनी हे नेमकं काय आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. लोढांचे पाच कोटी धर्मांध की धर्मनिरपेक्ष ते लोकांना कळलं पाहिजे. देणाराने देत जावे. आपली काहीच हरकत नाही. फक्त दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी निदान इतरांना नैतिकता, सेक्युलॅरिझम वगैरे शिकवू नये इतकंच, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केली आहे.

शरद पवारच राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी 78 रॅली काढून आक्रमक प्रचार केला होता. तरीही त्यांना 2014मध्ये मिळालेल्या यशाएवढंच यश मिळालं होतं. त्यानंतर पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि 54 जागा निवडून आणल्या. 2014 पेक्षा राष्ट्रवादीला यंदा 13 जागा जास्त मिळाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *