निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १५० प्राथमिक शिक्षकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ नियुक्‍त्या द्याव्यात – तानाजी कांबळे

| मुंबई | तब्बल दहा वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरती ची घोषणा केल्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षक उमेदवारांसाठी डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अभियोग्यता चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने शिक्षकांची निवड व्हावी या हेतूने पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले. अर्बन प्रायमरी स्कूल (UPS) आणि मुंबई पब्लिक स्कूल (MPS) अशा दोन प्रकारच्या वेगळ्या शाळा असूनही बृहन्मुंबई महानगरपालिकेने दोन्ही शाळांची एकत्र जाहिरात पवित्र पोर्टल आणि वृत्तपत्रांतून दिली. पवित्र पोर्टल अर्ज भरताना उमेदवारांना एम पी एस व यू पी एस असा प्राधान्यक्रम न देता फक्त बीएमसी हा एकच प्राधान्यक्रम देण्यात आला होता. ज्या उमेदवारांचे व्यावसायिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, असे उमेदवार बीएमसी हा प्राधान्यक्रम निवडू शकतात अशी सूचना पवित्र पोर्टल वर देण्यात आली होती. बीएमसी हा प्राधान्यक्रम निवडल्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली, त्यानंतर चार महिन्यांनी महानगरपालिकेने पात्रता नियमांचे कारण देऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे नाकारले. स्वतंत्र जाहिरात व स्वतंत्र प्राधान्यक्रम नसल्याने ही गोंधळ व्यवस्था निर्माण झाल्याचे महिला विभाग संघटक सौ उषा भालेराव यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून असणारे उमेदवार महाराष्ट्रात नाही. त्यामुळे महानगरपालिकेने निवड झालेल्या १५० शिक्षकांना नियुक्त्या द्याव्यात असे शिक्षण आयुक्त माननीय विशाल सोळंकी सर यांचे मत असल्याचे पात्र उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून असायला हवे. बृहन्मुंबई महापालिकेने मात्र ज्या उमेदवारांचे दहावीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले अशा १४ उमेदवारांना नियुक्‍त्या दिल्या आहेत. याउलट कनिष्ठ महाविद्यालयीन, व्यवसायिक, पदवी, पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातून होऊनही फक्त दहावीचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असल्यामुळे १५० प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या नाकारण्यात आलेले आहेत. सर्व निवडप्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करूनही फक्त दहावीचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याचे कारण देऊन नियुक्त्या नाकारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यात समन्वय नसल्याचा फटका १५० प्राथमिक शिक्षकांना बसला असल्याचे माध्यमिक विभाग प्रमुख श्री संजय केवटे यांनी सांगितले.

दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांचे बेमुदत आंदोलन आजाद मैदान मुंबई येथे सुरू आहे. सदर आंदोलनास महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शालेय शिक्षण विभागाने निवड प्रक्रियेतील पात्र १५० प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्याच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ नियुक्त्या द्याव्यात असे आवाहन मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केले. निवड प्रक्रियेत पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई कटिबद्ध असून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.