बिनधास्त करा UPI द्वारे पेमेंट, कोणताही अतिरीक्त चार्ज लागणार नसल्याचे NPCI चे स्पष्टीकरण..!

| मुंबई | केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. अनेक खासगी बँकांनी UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा सुरू केलीये. पण, नव्या वर्षापासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्यावर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने शुक्रवारी निवेदन जारी करुन स्पष्टीकरण दिलं आहे.

1 जानेवारी 2021 पासून UPI द्वारे केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, असं NPCI ने स्पष्ट केलं आहे. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, असं आवाहनही NPCI कडून नागरिकांना करण्यात आलंय. त्यामुळे नव्या वर्षातही UPI वापरकर्त्यांना विनामूल्य सेवा वापरता येणार आहे.

खासगी बँकांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बातमी समाज माध्यमांवर पसरली होती. नव्या वर्षापासून एका महिन्यात UPI द्वारे 20 पेक्षा अधिक व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहारावर 2.5 रुपये आणि 5 रुपये शुल्क द्यावे लागणार असल्याचं, या व्हायरल वृत्तात म्हटलं होतं. पण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचं NPCI ने स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *