वृद्धाश्रमाला अन्नधान्य वाटप व आर्थिक मदत करून मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन साजरा; ‘बुके नव्हे बुक’ देण्याचा संकल्प..

| माढा / महेश देशमुख | मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापनदिन टेंभुर्णी ता.माढा येथील गोविंद वृद्धाश्रमातील २६ निराधार वृद्धांकरीता गहू, तांदूळ, तेल,डाळी, साबण व मिठाईचे वाटप तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. 

राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली व वृद्धाश्रमातील निराधार वयोवृद्धासाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या वतीने पाच हजार रुपये आर्थिक मदतीचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वृद्धाश्रमाचे संस्थापक संचालक दशरथ महाडिक- देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.  वर्धापनदिनानिमित्त बोलताना जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी अ‍ॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांनी समाजातील नोकरदार वर्गाला बरोबर घेत १ सप्टेंबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना केली. मराठा सेवा संघाने धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचारप्रसार माध्यमसत्ता यांचे महत्व समाजाला पटवुन दिले व जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व विविध कक्षांच्या माध्यमातून महापुरूषांचे विचार घराघरांत पोहोचविण्याचे काम  केल्याचे सांगितले.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे, संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष नागनाथ महाडिक, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष रामभाऊ मिटकल, कार्याध्यक्ष शिवाजी गवळी, सचिव शंकर गवळी, नवनाथ दौड, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, जिजाऊ ब्रिगेडच्या टेंभुर्णी शहराध्यक्ष धनश्री ढवळे, आशा निमसे,शीला खटाले,संघटक सुवर्णा देशमुख, संभाजी ब्रिगेडचे टेंभुर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे, शंकर नागणे, अजय गायकवाड, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ सटाले उपस्थित होते.

बुके नव्हे तर बुक’ देण्याचा संकल्प :

लोकांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे. प्रबोधनाची चळवळ वाढविण्यासाठी एकमेकांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ‘बुके नव्हे  बुक’ देण्याचा विचार संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाला दिला आहे. ‘बुके नव्हे बुक’ देण्याचा संकल्प मराठा सेवा संघाच्या माढा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी वर्धापनदिनानिमित्त केल्याचे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.