आशिष कुडके :- हिंगोली : भाजपच्या विरोधानंतर एकनाथ शिंदेंना हिंगोलीतील आपलाच जाहीर उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आल्यानंतर हेमंत पाटील समर्थकांमध्ये नाराजी पसरलीय. सुरूवातीपासूनच भाजपने हेमंत पाटलांना विरोध केला होता.
त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नाव जाहीर केल्यानंतर मात्र भाजपने आक्रमक पवित्रा घेतला.
हेमंत पाटलांच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याचं सांगत भाजपने शिंदेंवर दबाव टाकला आणि शिंदेंपुढे कोणताही पर्याय उरला नाही.
शेवटी एकनाथ शिंदेंनी हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतली आणि त्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी जाहीर केली.
भाजपने या आधी हिंगोली मतदारसंघाचा अहवाल तयार केल्याचं सांगितलं जातंय. त्यामध्ये त्यांनी हेंमत पाटलांना जर उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होणार असं सांगितलं होतं.
कमी असलेला जनसंपर्क तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हेमंत पाटलांनी आपल्याच सरकराविरोधात राजीनामा देणं त्यांना भोवल्याचं दिसतंय.
त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मतावर कायम राहत हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर केली. आता मात्र ती बदलावी लागली.
हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याची कारणं काय ?
1) मतदारसंघात कमी असलेला संपर्क
हेमंत पाटील निवडून आल्यानंतर ते मतदारांच्या संपर्कात नसल्याचा आरोप केला जातोय. खासदार झाल्यानंतर मतदारसंघात नसायचे, बहुतांशवेळा मतदारसंघाबाहेरच असल्याचं सांगितलं जातंय. त्याचमुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला.
2) भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे मतभेद ….हेमंत पाटील हे गेल्या वेळी जरी युतीमधून निवडून आले असले तरी निवडणुकीनंतर त्यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे मतभेद वाढल्याचं सांगितलं जातंय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हेमंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा राग भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होता. युतीमध्ये सोबत असताना कोणताही निर्णय घेण्यासाठी भाजपच्या लोकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता.
3) मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत आरक्षणासाठी उपोषण करणे
राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना हेमंत पाटलांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना, मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका करत असताना हेमंत पाटलांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेत राजीनामा दिल्याने भाजप त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय.