“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!


| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील अहिल्यादेवी जयंती अण्णा डांगे यांनी सुरू केल्याचा खोटा दावा त्यांनी केला आहे.

वास्तविक ही जयंती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काळात गोपिचंद पडळकरांनी खोटे बोलणे बंद न केल्यास त्यांना त्यांची औकात दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीचे (पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

या पत्रकार परीषेदला पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पुणे युवक शहराध्यक्ष उमेश कोकरे, पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे विशाल सरगर, पळसावडे उपसरपंच तथा माण तालुका युवक उपाध्यक्ष दादासाहेब डोबाळे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पडळकर गेल्या काही दिवसांतून अहिल्यादेवींच्याच कार्यक्रमाला गालबोट लावून हुल्लडबाजी करत आहेत. जेजुरी आणि सांगली येथे अहिल्यादेवींची देखणी स्मारके उभी केली आहेत. या दोन्ही ठिकाणी पडळकर यांनी कार्यक्रमाला पडळकर उपस्थित होते तरीही त्यांनी या कार्यक्रमाला गालबोट लावले. उद्या चोंडीत होणाऱ्या कार्यक्रमात पडळकर पुन्हा स्टंटबाजी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तो प्रयत्न पोलिसींनी हाणून पाडावा, असे आमचे पोलिसांना आवाहन आहे. तसेच पडळकरांनी खोटे बोलणे बंद न केल्यास त्यांची औकात दाखवून देऊ, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी साजरी करण्याचा प्रघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पाडला. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे २० वर्षे जयंती साजरी केल्यानंतर हा उत्सव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा निर्णय झाला. मुंबईत ४ वर्षे जयंती झाल्यानंतर यंदा राजधानी दिल्लीत जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर येथेही जयंती होणार आहे, त्याबरोबरच महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published.