पहिल्या आदेशाची शाई वाळण्यापूर्वीच नवा आदेश, सहकार विभागाचे घुमजाव, पुन्हा सहकारी संस्थांना ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ..!

| मुंबई | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस ठरावांसाठी सुरु असलेली इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक लागला आहे. सहकार खात्याच्या या निर्णयामुळे शेकडो सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे गेल्या आहेत.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले आणि राज्यातील सर्वच निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. तसेच ज्या संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यांचा निवडणूक कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

तीन महिने या संस्थांना मुदतवाढ देण्यात आली होती. तीन महिन्याची मुदत संपल्याने पुन्हा या निवडणुकींना तीन महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नुतन वर्षात केव्हावी निवडणूक जाहिर होण्याची शक्‍यता होती. त्यानुसार मंगळवारी (ता.१२) सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे आदेश काढण्यात आले. मात्र या शासन निर्णयाची शाई वाळते न वाळते तोपर्यंत लगेच शनिवारी (ता.१६) पुन्हा या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार आता ३१ मार्च २०२१ पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याच्या अर्थवाहिनी असणाऱ्या सहकारी साखर कारखाना यासह शेकडो संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मंगळवारी निवडणुकीचे आदेश आल्यानंतर इच्छुकांकडून मोर्चेबांधणी, गाठीभेटी सुरु होत्या. मात्र लगेचच या निवडणुकांना स्थगिती मिळाल्याने इच्छुकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. सध्या आहे त्या टप्प्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच जेव्हा या निवडणुका होतील तेव्हा त्या थांबलेल्या टप्प्यावरुनच पुढे सुरु होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *