PMC बँक घोटाळ्यात अजून एका शिवसेना नेत्याचे नाव.? किरीट सोमय्या यांनी केला आरोप..

| मुंबई | पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी एका शिवसेना नेत्याचं नाव समोर आलं आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ ट्वीटच्या माध्यमातून हा दावा केला आहे.

पीएमसी घोटाळ्याशी नाव जोडलेला हा शिवसेनेचा नेता माजी खासदार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. मात्र, हा नेता कोण? हे सोमय्या यांनी स्पष्ट केलेलं नाही. पीएमसी घोटाळ्यात लाभार्थी ठरलेला हा नेता व त्याच्या कुटुंबीयांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळं आता या नेत्याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

काय आहे हे प्रकरण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवले. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले. त्या रक्कमेतून वर्षा यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६,६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे. वर्षा राऊत यांची या प्रकरणी काल चार तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *