“पुंडलिकाच्या भेटीला जणू परब्रह्म आले” ; शरद पवारांच्या निलेश लंके यांच्या भेटीवर निलेश लंके भावूक..!

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार थेट आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. शरद पवार आपल्या छोट्याशा घरी आल्यावर अख्खं लंके कुटुंब भारावून गेलं होतं. त्यानंतर आज निलेश लंके यांनी आपल्या भावना फेसबूक पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी काही क्षण मंतरल्यासारखे होते, असं निलेश लंके म्हणालेत.

काय आहे निलेश लंकेंची फेसबूक पोस्ट?

“साहेब,तुम्ही नगर जिल्ह्यात येणार आहात तर तुम्हाला घरी यायचंय”
ही विनंती ऐकल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी हातातील कागदांमधून नजर वर करुन विचारले,
” कुणाच्या घरी?”
“माझ्याच घरी ” मी उत्तर दिलं.
त्यासरशी साहेबांनी त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांना डायरीत तशी नोंद करायला सांगितली. त्यानंतर ते जेंव्हा अहमदनगर जिल्ह्यात आले तेंव्हा तिथल्या कार्यक्रमात त्यांनी मला खास जवळ बोलावून.
“आपल्याला घरी जायचंय. तु माझ्या गाडीत बस”, असं सांगितलं.
पुढचे काही क्षण जणू मंतरल्यासारखे होते. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले…माझ्या आई-वडीलांसोबत त्यांनी संवाद साधला. आम्हा उभयतांना आशीर्वाद दिले.

घर तसं छोटंच आहे, वडीलांनी बांधलेलं. त्याच घरात एका छोट्या खुर्चीवर साहेब बसले होते. साहेब कितीतरी वेळ फक्त घराकडे बघत होते. माझ्या वडीलांना त्यांनी हाताला धरुन जवळ बसवून घेतलं.घरात कार्यकर्त्यांची रीघ लागलेली होती.आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारला. पुंडलिकाच्या भेटीला जणू परब्रह्म आल्याची ही भावना होती. जवळपास अर्धा तास साहेब घरी थांबले. जेंव्हा परतीची वेळ आली तेंव्हा आपण सर्वजण मिळून एक फोटो घेऊयात असं ते आवर्जून म्हणाले. साहेबांच्या सोबत एकाच फ्रेममध्ये येण्यासाठी भाग्य लागतं. हे भाग्य त्या मंतरलेल्या क्षणांनी आम्हा सर्वांना लाभलं. आम्ही कृतज्ञ आहोत.

इयत्ता तिसरी-चौथीमध्ये असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला होता. आमदारकीच्या तिसरीत ( तिसऱ्या वर्षाकडे जात असताना) आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यानंतर आज माझ्या घरी येऊन आम्हाला सहकुटुंब आशीर्वाद दिले. आयुष्याचे सार्थक झाले. जनसेवेसाठी झुंजण्याचं, लढण्याचं बारा हत्तींचं बळ अंगात आलं.

धन्यवाद साहेब !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *