पुन्हा पत्रकारांच्या मदतीला धावले खासदार डॉ श्रीकांत शिंदे, कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळावी, मुख्यमंत्र्यांना साकडे..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. सध्या ४५ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे फ्रंट लाईन वर्कर म्हणून लसीकरण होणे तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळणे आवश्यक असल्याचे कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडले आहे.

यापूर्वी देखील मागील वर्षातील लॉक डाऊनच्या काळात पत्रकारांच्या आरोग्य शिबिरे यासह वेगवेगळ्या स्तरावरील समस्यांच्या बाबतीत मदतीला खासदार डॉ श्रीकांत शिंदे धावून गेले असल्याचे सर्वश्रुत आहेच. या पत्रातून त्यांनी विविध राज्यांनी घेलतलेल्या निर्णयांचा दाखला दिला असून पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.

काय आहे पत्रात :

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एक महत्वाच्या विषयासदंर्भात आपले लक्ष वेधु इच्छितो की, आपले पत्रकार बांधव जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका देखील अधिक आहे. तरी सर्व पत्रकार मित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन तातडीने त्यांचे लसीकरण करण्यात यावे, असे माझे प्रांजळ मत आहे. तामिळनाडु, ओडीसा, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांनी देखील याबाबत निर्णय घेतला आहे. तरी इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील असा निर्णय घ्यावा अशी मागणी यापत्राद्वारे मी करत आहे.

तसेच, आपले कर्तव्य बजावत असताना गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गामुळे अनेक पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कोरोनामुळे दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी पन्नास लाख रुपयांची (रु.५० लाख) आर्थिक मदत योजना यथाशीघ्र जारी करावी अशी नम्र विनंती करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *