कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठमोठ्या वल्गना करुन आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं, ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही.
त्यामुळे कार्यकर्त्याला पुढे करुन “तुम लढो, हम कपडा संभालते है” अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली, अशी टीका शिवसेना खासदार आणि कल्याण डोंबिवलीतून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा नारळ श्रीकांत शिंदे यांच्याकडून फोडण्यात आला.
मतदारसंघामध्ये विकास झाला नाही म्हणून गोंधळ करतायेत. आमदारांनी जो गोळीबार करायला लावला, त्याची शिक्षा त्यांना मिळाली. निवडणुकीच्या काळात वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी. पर्सनल अजेंड्यासाठी या सगळ्या गोष्टी होत असतील तर वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेत शुक्रवारी केलेल्या गोंधळावर दिलीय.
महायुतीतील बहुप्रतीक्षित कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर आज सकाळी जाहीर झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवलीचे विद्यमान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घोषित केली.
भारतीय जनता पक्षाकडून कुठलाही विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असतील. ते महायुतीचे उमेदवार असतील. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबरीपणे उभा राहील, पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे- भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासप- आमची बृहद युती त्यांना निवडून आणेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आलेत. यंदा त्यांना विजयाची हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटातून वैशाली दरेकर उमेदवार आहेत.
कल्याण डोंबिवलीची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना मिळाली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार, याची उत्सुकता लागली आहे.