राज ठाकरेंनी महायुतीत यायला हवं, आम्ही रेड कार्पेट टाकू, संजय शिरसाट ‘शिवतीर्थ’वर

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन संजय शिरसाट यांनी भेट घेतली. मनसेचा महायुतीतील सहभाग लांबलेला असतानाच संजय शिरसाट यांनी ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे. परंतु ही कुठलीही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा रंगली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास संजय शिरसाट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. “राज ठाकरे आणि आमचे जुने संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठवाड्यात सभा व्हायच्या, तेव्हा राज ठाकरे आवर्जून त्यांना उपस्थित राहायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. तसंच आमचं आहे.

फार दिवसांपासूनची इच्छा होती, की राज ठाकरेंशी गप्पा माराव्यात. भेटल्यावर राजकीय विषयावर थोड्याबहुत चर्चा होत असतात, पण आता पुढे काय करायचं, यांनी काय करायचं, अशा विषयांवर आज चर्चा नव्हत्या. आज आम्ही फक्त जुन्या आठवणींना आम्ही उजाळा दिला” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

” महायुतीचा संदेश घेऊन तुम्ही आलात का, असा प्रश्न विचारला असता शिरसाट म्हणाले की, मी महायुतीचा कोणताही मेसेज घेऊन आलेलो नाही. असे मेसेज वरिष्ठ पातळीवर दिले जातात. माझ्या सारख्याच्या माध्यमातून असा कुठला मेसेज दिला जाईल, अशी कल्पनाही मी करु शकत नाही. आपण दिलखुलास भेट घेतली, बोलत-बोलत चहा घेतला, गतकाळातील घटनांना उजाळा दिला” असंही शिरसाट म्हणाले.

“साहेब तुम्ही महायुतीत आलं पाहिजे, तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणाऱ्यांमध्ये आम्ही असू, असं आम्ही आधीपासून सांगत आलोय. उघडपणे बोलत आलोय, ते महायुतीत आले तर ताकदीचा वेगळा परिणाम जाणवेल आणि सीट निवडून येतील. पण सध्या राज ठाकरेंचं लक्ष त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे आहे. युतीविषयी नंतर ते बोलतील. माझं वैयक्तिक मत आहे, की राज ठाकरेंनी महायुतीत यावं” असा मनोदयही संजय शिरसाट यांनी बोलून दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *