” राजन स्वत:ची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा ” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी साधला संवाद..!

| रत्नागिरी / लोकशक्ती ऑनलाईन | ‘राजन’ मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच ‘राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी थेट संवाद साधला तेव्हा आमदार राजन साळवी यांचे डोळे पाणावले !

कोरोनाचे संकट धुमाकूळ घालत असतानाच चक्रीवादळाचे आगमन झाले.१४ मे रोजीच वादळाने परिणाम दाखवण्यास सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर हे वादळ पहिले राजापूरमध्ये धडकले. त्याचवेळी आमदार राजन साळवी यांनी थेट रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली.अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ते सतत उपाययोजनासाठी मार्गदर्शन करत होते.

प्रत्यक्ष वादळाचा तडाखा बसल्यानंतर भूक तहान विसरून त्यांनी पूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला.ज्या-ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्तांना धीर देत स्वतः शक्य तितकी मदत केली. तसेच प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले.

या कामाची तत्काळ दखल शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि बुधवारी रात्री अचानक राजन साळवी यांचा फोन खणखणला… समोरून चक्क उद्धव ठाकरे यांचा आवाज आला…..’राजन कसा आहेस ? वादळाचे परिणाम कुठपर्यंत ?किती नुकसान झाले ? मच्छीमार बांधवांचे किती नुकसान ? जीवितहानी नाही ना? असा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर कोरोना परिस्थितीची माहितीही त्यांनी घेतली.

पुढचे वाक्य तर राजन साळवी यांना सदगदित करणारे होते. किती फिरतोस रे ‘राजा’ स्वतःची काळजी घेऊन काम कर, मी लवकरच तुमच्या भेटीसाठी येतोय. हे वाक्य कानावर पडताच राजध साळवी अक्षरशः गहिवरले. डोळे पाणावले. सदगदीत स्वरात म्हणाले ‘साहेब तुमच्या कामातूनच प्रेरणा आणि ताकद मिळते आहे.

लगेच उद्धव ठाकरे यांचे पुढचे वाक्य होते. अरे मी काही नाही. तुझ्यासारखे शिवसैनिक हीच माझी ताकद, त्यामुळेच हे माझ्याकडून होत आहे. या शब्दाने तर आमदार राजन साळवी यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. साहेब स्वतःची काळजी घ्या, इतकेच शब्द त्यांच्या तोंडातून निघाले.

उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा तू काळजी घे म्हणत संवाद थांबवला. कित्येक मिनिटे आमदार राजन साळवी शांत आणि स्तब्ध होते. पक्षप्रमुख आणि राज्याच्या प्रमुखाने केलेली ही विचारपूस आणि आपुलकी घेऊन ते पुन्हा मतदारसंघात पुढच्या भेटीसाठी रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *