राज्यात सहकारी संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, जिल्हा बँका, शिक्षक बँका, सोसायटी यांच्या प्रचाराची रणधुमाळी होणार सुरू..!

| पुणे | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. राज्य सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या टप्प्यापासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अडीचशे आणि त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळण्यात आल्या असून, त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँका, सोसायट्या, पतपेढी, शिक्षक बँका यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (ता. 12) जारी केले. राज्य सरकारने कोरोनाच्या संसर्गामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2020 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

हा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका होणार की मुदतवाढ मिळणार, याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकललेला कालावधी संपुष्टात आल्यापासून सहा महिन्यांत पात्र सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे 45 हजार सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यात येईल. 18 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी “जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार करण्याच्या सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सामाजिक अंतर राखण्यात यावे. मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनींग उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी दिली असून, पहिला टप्पा जाहीर केला आहे. सहा टप्प्यांत या निवडणुका घेण्यात येतील. अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी नियमावली आल्यानंतर त्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल.
– यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण

Leave a Reply

Your email address will not be published.