वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शिक्षकाची धडपड, कार्यक्रमात ‘बुके नव्हे तर बुक’ देतात भेट, जिल्हा परिषदेच्या पुस्तकप्रेमी शिक्षकाचा कौतुकास्पद उपक्रम..!

| सोलापूर : अमोल सिताफळे | हल्ली भारतीय सण-समारंभ आणि कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्वत: च्या आनंदासाठी समारंभ भव्यदिव्य करण्याकडे कल असतो. लोक कार्यक्रमात बुके, हार- तुरे यावरती खर्च अमाप करतात. परंतु नंतर ती फुले अथवा बुके सुकून कोमेजून गेल्यावर कचऱ्यात टाकून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याचे महत्त्व एक दिवसच. पण त्याऐवजी ‘बुक’ दिले तर त्या व्यक्तीच्या स्मरणात कायमचे राहता येते. शिवाय वाचन संस्कृती टिकून राहते. म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने ‘बुके ऐवजी बुक’ देण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. 

नीलेश शशिकांत देशमुख असे या युवा शिक्षकाचे नाव आहे. ते मुळचे माढा तालुक्यातील तांबवे या गावचे रहिवासी. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. श्री देशमुख २०१४ पासून आजतागायत पै-पाहुण्यांचे विविध समारंभात, वाढदिवसाला कोणत्याही प्रकारची फुले, बुके भेट न देता त्यांना प्रबोधनात्मक पुस्तके भेट देतात. यासह दरवर्षी ते आपली मुलगी काव्या आणि मुलगा राघव यांच्या प्रत्येक वाढदिनी दरवर्षी साधारणतः २०० पुस्तके वाटप करतात. वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी उपयुक्त असलेली त्यांची ही संकल्पना इतर शिक्षकमित्राने उचलून धरत कार्यक्रमात एकमेकांना पुस्तके भेट देण्यास सुरवात केली.

‘बुके नव्हे तर बुक भेट’ देण्याच्या संकल्पनेविषयी देशमुख सांगतात, ‘मला पुस्तके वाचण्याची भारी हौस. दरवर्षी राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा होतो. येथे पुस्तक महोत्सव भरला जातो. या महोत्सवातून दहा हजारांची पुस्तके खरेदी करुन ती वर्षभर विविध समारंभात लोकांना भेट देतो. लोकांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करणे हाच या पाठीमागचा हेतू. भेट दिलेले पुस्तक ती व्यक्ति पुस्तक वाचल्यावर रद्दीत न टाकता दुसर्‍याला वाचण्यासाठी भेट द्यावी, म्हणून पुस्तकावर सप्रेम भेट म्हणून लिहिणे मी बंद केलं आहे. पुस्तकांवर सप्रेम भेट असे लिहिल्यास सदर व्यक्ती पुढच्या व्यक्तीला ते पुस्तक भेट देऊ शकत नाही.’

पुढे ते सांगतात, ‘बुके नव्हे तर बुक भेट’ देण्याची संकल्पना सुरू करणे पाठीमागे अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांची खुप मोठी प्रेरणा आहे. त्यांना प्रथम भेटलो तेव्हा त्यांनी मी आणलेला फुलांचा बुके स्वीकारला नाही. ते म्हणाले मी फक्त पुस्तकेच भेट म्हणून घेतो. तुम्हीही पुस्तके भेट देत चला. आणि तेव्हापासुन आजपर्यंत भेटवस्तू म्हणजेच पुस्तके हे माझ्या बाबतीत समीकरण दृढ झाले. ‘जर तुमच्याकडे दोन रूपये असतील तर एक रूपयांची रोटी घ्या आणि एक रूपयांचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल’ या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार हा पुस्तके भेट देण्याचा प्रयत्न चालू आहे.”

पाच हजारपेक्षा जास्त पुस्तके दिली भेट :

पुस्तके वाचन चळवळीतील महत्त्वाचा भाग आहे. ते वाचकांना प्रेरित करतात. ‘पुस्तक वाचन चळवळी’ने पावले पुढे टाकावे, या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत जवळपास ५ हजारापेक्षा जास्त प्रबोधनात्मक पुस्तके लोकांना भेट म्हणून दिली आहेत. भेट दिलेली पुस्तके मोठी माणसे वाचतात, हे पाहून मुलांनासुद्धा वाचनाची गोडी लागण्यास मदत होत आहे. त्याद्वारे वाचन चळवळ वाढवण्यास मदत होत आहे. शिवाय पुस्तक वाचनाने त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक प्रबोधन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *