राज्यातील शिक्षकांसाठी मोठा निर्णय, कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर..!

| पुणे | कोरोनाच्या संकट काळात कोविड-19 संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार “50 लाख रुपयांचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच’ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना या “विमा कवचा’चा लाभ मिळू शकणार आहे.

कोविड -19 विषाणूच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये रक्कमेचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच पुरविण्याबाबत वित्त विभागाने 29 मे 2020 मध्ये शासन निर्णय लागू केला होता.

या निर्णयाप्रमाणे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील विमा कवच मिळावे, अशी मागणी विविध संघटनांमार्फत सातत्याने होत होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा देखील केला जात होता. आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे 2020 च्या शासन निर्णयाच्या तरतुदी पूर्ण करणारे परिपूर्ण प्रस्ताव मागितले असून शासन निर्णयानुसार हे प्रस्ताव तपासून संबंधित प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

“प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उशिरा का होईना कोरोनाबाबत कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देणारे हे “विमा कवच’ लागू करण्यासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे, हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे. यासाठी संघटनेने मंत्रालयात तसेच संचालक कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. या बाबत संचालक कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील आम्ही ठोस मागणी मांडली होती. 

– श्री. प्राजक्त झावरे पाटील, राज्य माध्यम प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Leave a Reply

Your email address will not be published.