सचिन वाझे प्रकरणात अजून एका मंत्र्याच्या राजीनामा आज येणार – चंद्रकांत पाटील

| कोल्हापूर | पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

पाटील यांनी सांगितले, या महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनिल राठोड या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, दुसरे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, तर तिसरे मंत्री आज सायंकाळपर्यंत राजीनामा देतील असे भाकित पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले.

राज्यात कृत्रिम बहुमताचे सरकार सत्तेत आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी मतदान घेतले तर सरकारच्यामागे किती बहुमत आहे दिसून येईल. सचिन वाझे प्रकरणाची मुळे खूप लांबपर्यंत गेली असून एनआयए व एटीएस हे सर्व खोदून काढेल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, दीड वर्षांत एका मंत्र्याचा राजीनामा झाला. एक जाता जाता वाचला व आज, संध्याकाळपर्यंत एका मंत्र्याचा राजीनामा होईल. सरकार कसे चालले आहे हे त्यावरून दिसत आहे.

पत्रकारांनी या मंत्र्याचे नाव काय असेल, असे विचारले असता वेट ॲन्ड वॉच असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडीवरुन राज्य् सरकारवर टीका केली. हे प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे.

सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *