सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊतांचे सूचक ट्विट..!

| मुंबई | मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्फोटकं भरलेल्या गाडीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून, अटकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयकडे देण्यात आला आहे. एनआयएने तपास सुरू केला असून, मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची चौकशी केल्यानंतर शनिवारी वाझे यांची चौकशी केली. चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली.

वाझे यांना अटक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. “लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात. पण तुम्ही केलेलं चांगल काम ते हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं वर्णन त्यांनी कसंही केलं, तरी तुम्हाला ओळखणारे तुमचा आदर्श कायम ठेवतील,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली. एनआयएने तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना अटक अटक केलं. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, वाझेंविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सचिन वाझेंनी आधीच न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवत अर्ज फेटाळून लावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *