संजय राऊत यांच्यापेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची अधिकची माहिती, नितेश राणेंचा खोचक टोला..!

| मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात सातत्याने कुरबुरी पाहायला मिळतात. आणि आता देखिल नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या या टीकेला आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत जिथे जिथे जातात तिथे आमची सत्ता येते. बेळगावमध्ये काय झाले? आज मी देवाचे आभार मानले की त्यांच्यावर अशीच जबाबदारी दे. कारण हा माणूस सगळीकडे जाऊन फक्त शिवसेना संपवण्याचं काम करत आहे, अशी घणाघाती टीकाही नितेश राणेंनी केलीय. गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारावं. कारण त्यांना माहिती आहे की गोव्याचा किती छान विकास झालाय, अशी टिकाच आता राणे यांनी केली आहे.

सिद्धू जसं काँग्रेस संपवण्याचं काम करत आहेत, तसंच काम येथे संजय राऊत करत आहेत

मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या हातात होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं आहे. शेतकऱ्यासमोर कसं जगायचं असा प्रश्न आहे. मुंबई महापालिकेकडे 80 हजार कोटीच्या ठेवी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन आहे की राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून केंद्राकडे काही मागण्यापेक्षा हे 80 हजार कोटीचं डिपॉझिट तोडा आणि शेतकऱ्यांना मदत करा. आता तुमची सत्ता आहे. राज्यातील शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री हा निर्णय घेणार का? मुंबई महापालिकेचं 80 हजार कोटीचं डिपॉझिट तोडणार का? असा सवाल नितेश राणेंनी केलाय. त्यांना कुणाला विचारण्याची गरज नाही. मात्र, त्यांचा हेतू स्वच्छ असला पाहिजे, असा टोलाही नितेश राणे यांनी यावेळी लगावलाय.संजय राऊत यांचे गोव्याला पाय लागल्यामुळे आता गोव्यात आमचा मुख्यमंत्री बसणार हे माझं ठाम मत आहे. पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू आणि आणि येथे संजय राऊत हे एकाच तालमीत बसणारे लोक आहेत. पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू जसं काँग्रेस संपवण्याचं काम करत आहेत, तसंच काम येथे संजय राऊत करत आहेत. संजय राऊत हे भाजपसाठी पोषक काम करत आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची बैठक ही केवळ नौटंकी होती

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुनही नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. कंत्राटदाराला भरमसाठ पैसे दिले जातात. मग स्टँडिंग कमिटीमध्ये अंडरस्टँडिंग होते. मुख्यमंत्री इंजिनिअरला जबाबदार धरणार आणि त्यांच्यावर कारवाई करणार, अशी माहिती आम्हाला मिळतेय. मुख्यमंत्रांवर हिम्मत असेल तर मातोश्रीवर उठबस करणाऱ्या ठेकेदारांवर त्यांनी कारवाई करावी. आम्ही लवकरच या ठेकेदारांची माहिती समोर आणणार आहोत, असा दावाही नितेश राणेंनी केलाय. हे ठेकेदार नीट रस्ता बनवत नाहीत. आज केलेला रस्ता परवापर्यंत टिकत नाही, त्यावर लगेच खड्डे पडतात. कलानगरच्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही. कारण ते मातोश्रीच्या जवळचे आहेत. फक्त दोन-तीन लोकांनाच रस्ते बनवण्याचं कंत्राट कसं मिळतं? त्यांचे संबंध सत्ताधारी शिवसेनेशी कसे आहेत हे सिद्ध केल्यानंतरच लोकांना कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची बैठक ही केवळ नौटंकी होती, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केलीय. हिम्मत असेल तर जे मातोश्रीवर उठबस करतात त्यांच्यावर कारवाई करुन दाखवा, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *