राज्यपालांशी नव्हे भाजपशी आमचे खुले युद्ध आहे – संजय राऊत

| नाशिक | शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हे आमचे शीत युद्ध नसून हे भाजपशी खुले युद्ध असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्यपाल युद्ध खेळत नसून भाजप युद्ध खेळत आहे, असे राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये नूतनीकरण केलेल्या शिवसेना कार्यालयाचे उदघाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री मंडळाच्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांवर घटनेने बंधनकारक आहे. परंतु असे असातानाही राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, अशी टीकाही राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींवर पुन्हा एकदा केली आहे. राज्यपालांचा विमान प्रवास रोखणे हे एक आयुध आहे. अशी अनेक आयुध युद्धात वापरता येतात, असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारेही राऊत यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

राज्यपालांनी शहाण्यासारखे वागावे असे संकेत आहेत. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत:च्याच कासोट्यात पाय गुंतून का पडत आहेत?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

राज्यपालांच्या कार्यालयाने विमान उडवण्याची परवानगी मागितल्यानंतर एक दिवस आधीच सरकारने परवानगी नाकारली. असे असतानाही राजभवनाने राज्यपालांना विमानात नेऊन का बसवले?, असा सवाल करतानाच राज्यपालांचा हा दौरा खासगी असल्याने नियमाने सरकारी विमानाचा वापर करता येत नाही आणि हे कळूनही राज्यपाल विमाना बसले याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले होते.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा उपस्थित केला मुद्दा

भारतीय जनता पक्ष आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडताना संजय राऊत यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दाही उपस्थित केला. राज्यपाल नियुक्त आमदारांना सहा वर्षांचा कालावधी मिळतो. राज्यपालांच्या स्वाक्षरीला विलंब होत असल्याने या आमदारांचा कालावधी कमी होतो आहे, असा मुद्दाही राऊत यांनी आज पुन्हा एकदा मांडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *