शाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..!

| रायगड | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तुटवली या गावच्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक कोरोनाबाधित झाल्याने त्यांना होम कारंटाईन करण्यात आले आहे. मात्र ते शाळेत अध्यापन करत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य शासनाच्या धोरण कार्यक्रमानुसार शिक्षण विभागाकडून कोरोना महामारीच्या संकटात राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार किंवा शिक्षण मंत्रालयाकडून शाळा सुरू होण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसताना मात्र शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत येथील गट शिक्षण अधिकारी श्री. हंबीर व शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुभाष साळुंखे यांनी केंद्र प्रमुखांच्यामार्फत तोंडी आदेश देवून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळा महिन्यापूर्वी सुरु केल्याची माहिती नाव न छापण्याचा अटीवर प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातील शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दोन तास भरत आहेत.

तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तुटवली येथील शाळेवर संतोष माणीक हुळाले हे नेमणुकीस असलेले शिक्षक शाळेवर वर्ग घेत होते. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार व आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार शिक्षक संतोष हुळाले हे कोरोनाबाधित असून त्यांना होम कवरांटाईन करण्यात आले आहे. त्यांचा संबंध विद्यार्थ्याशी व इतर व्यक्तीशी येणे नाकारता येत नाही.

आता तालुका आरोग्य विभागाने संबंधितांचा शोध घेवून त्यांची कोरोना टेस्ट करणे आवश्यक व महत्वाचे झाले आहे. तसेच शिक्षकच कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गट शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी तोंडी आदेश देत शासन निर्णयाला धुडकावत शाळा सुरु केल्या. आजमितीस पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या ११ वर्षांच्या कोवळ्या जीवांशी खेळण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असूनही त्यांना कोरोना झाल्याचे समजते. तसेच शाळा सुरू करतेवेळी पालकांकडून संमतीपत्र घेण्याचा उद्योगही गट शिक्षण विभागाकडून केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली असून या सर्व अवैध प्रकारची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

” आठवीचे वर्ग सुरू करण्याची माहिती मिळत असून प्राथमिक शाळा सुरू आहेत. याची माहिती घेवून सांगितले जाईल.
सी. बी. हबीर, गटशिक्षणाधिकारी, पोलादपूर

“मी कोणतेही तोंडी आदेश दिलेले नाहीत. तसेच शिक्षक शाळेत गेल्यावर शिक्षकाने दोन तास विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा, असे सांगितले आहे.”
सुभाष साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी, पोलादपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *