| कल्याण | लॉकडाऊन काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार स्वतः सक्रिय राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी नेहमीच आपल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठींबा दिला आहे. सद्या मार्गशीर्ष हा पवित्र मास चालू आहे.या महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणून शालिनीताई यांनी मुंबई, ठाणे,कल्याण व इतर शहरातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
मनसे पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला या रस्त्यावर उतरून आपआपल्या परीने लोकांना मदत करत होते,कोणाचे हॉस्पिटलचे बिल कमी करून देणे,गरीब कुटुंबाना रेशन उपलब्ध करून देणे, कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णांना रुग्णालय उपलब्ध करून देणे यासारखी अनेक लोकोपयोगी कामे केली.
खासकरून सर्व महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्याच्या कामाची दखल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली.कोरोना काळात महिलांनी केलेले कार्य यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि त्यांची प्रसंशा करणे हे कार्यकर्त्याला अपेक्षित असते.
कोरोना काळातील उत्कृष्ट महिला सेनेचे कार्य,नवीन वर्षाची सुरुवात, येणारी मकर संक्रांत यांचा त्रिवेणी संगम साधत पक्षाच्या वतीने महिलांचा सन्मान करण्याची कल्पना सुचली, म्हणून महालक्ष्मी व्रत सस्नेह भेट दिली असल्याचे शालिनीताई यांनी सांगितले.
कल्याण जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला.शालिनीताईनी त्यांना अनपेक्षित भेटवस्तू पाठविल्याने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. शालिनीताईनी नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ व शाबासकी दिलेली आहे. या स्नेह भेटवस्तूमध्ये साडी,ओटी,तिळाचे लाडू व शुभेच्छापत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व भेटवस्तू महिला पदाधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी त्यांनी ‘वुमन ऑन व्हील’ ची निवड केली आहे.
अमृता माने या तरुणीने काही महिला आणि तरुणीना प्रशिक्षित केल्या असून त्या भेटवस्तू पोहच करतात.या भेटवस्तू देताना कोरोनाच्या काळात आपापल्या विभागात लोकांना साथ देणाऱ्या या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं शालिनीताई ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.अनपेक्षितपणे भेटवस्तू व आपुलकीचं शुभेच्छापत्र मिळाल्याने जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांनी देखील शालिनीताईचे पत्ररूपाने आभार व्यक्त केले आहेत.कल्याणमध्ये अनेक महिला पदाधिकाऱ्यांना शालिनीताई ठाकरे यांनी सुखद धक्का दिला आहे