श्री मावळी मंडळ संस्थेचे विश्वस्त जोसेफ फर्नाडिस यांचे दु:खद निधन..!

| ठाणे | ठाण्यातील नामांकीत व शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या श्री मावळी मंडळ ह्या संस्थेचे विश्वस्त श्री. जोसेफ केतान फर्नाडिस ह्यांचे दिनांक १४ सप्टेंबर रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी, सून व जावई असा परिवार आहे.

तब्बल २५ वर्षे श्री मावळी मंडळ संस्थेचे उपाध्यक्षपद , तर ११ वर्षे अध्यक्षपद भूषविणारे जोसेफ फर्नांडिस अगदी बालपणापासूनच मंडळाच्या मैदानात रमू लागले. ठाण्यातील न्यू इंग्लिश शाळेचे विद्यार्थी असलेले जोसेफ शाळा सुटल्यानंतर थेट मावळी मंडळाचे मैदान गाठायचे. तिथे चालणारा हुतुतु संघाचा सराव बघताना हरखून जाणारे ते आपसूकच श्री मावळी मंडळ हा बलाढ्य संघात १९६४ मध्ये सामील झाले. १९६९ सालापर्यंत हुतुतु व त्यानंतर सुमारे १० वर्षे श्री मावळी मंडळ संस्थेच्या, सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या व ठाणे जिल्हाच्या संघात एक आक्रमक खेळाडु म्हणून ते नावारूपाला आले.

१९७१ ते १९७३ दरम्यान ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणीत त्यांनी १५ वर्षे उपसचिव म्हणून काम केले. तसेच भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले जोसेफ फनांडिस हे एक उत्तम समालोचक ही होते.

श्री मावळी मंडळ संस्थेची व्यायामशाळा, सभागृह व शाळा ह्या सर्वांच्या उभारणीत व यशात जोसेफ फर्नांडिस यांचा सिंहाचा वाटा होता. आपल्या मधाळ वाणीने सर्वाना आपलेसे करणारे अजातशत्रू जोसेफ फर्नाडिस आज अनंतात विलीन झाले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना मावळी मंडळ परिवाराने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *