विशेष लेख : “Being The unique Man…. Brings The beautiful world” अपराजित योद्धा..!

प्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते, मग तो शेतामध्ये दोनशे रुपयांवर काम करणारा शेतमजूर असो; की मग मोठा उद्योजक. अगदी लहानपणापासून “बाळा, तुला काहीतरी मिळवायचं.” हेच त्याला शिकवलं जातं. आपल्या महत्त्वाकांक्षेपुढे जग शुन्य असत हेच त्याच्या मनावर बिबवलं जात. तो शाळेच्या एखाद्या शर्यतीत कधी पहिला आला तरी आपली छाती फुलून येते.. आणि ती यायलाच हवी. पण आपण अशा प्रत्येक शर्यतीत तुला नेहमीच अव्वल राहता यायला हवं; हे बाळकडू त्याला पाजायला मात्र त्याही वेळी विसरत नाही. त्यानं झाडांच्या पानापासून एखादी कलाकृती बनवली म्हणून आपण त्याच कौतुक करतो; पण त्या कलाकृतीला बनवताना त्यानं पानं तोडलेल्या झाडांचं काय झालं हे विचारायलाच आपण विसरतो. त्यानं मातीचं शिल्प बनवलं तर आपल्याला आनंद होतो; पण ती माती त्यानं कुठून आणली हे मात्र त्याला विचारतच नाही.

तो कधी एखाद्या परीक्षेत दुसरा वा तिसरा आला; तेव्हा आपण त्याची पहिला आलेल्याशी तुलना करतो, त्याला शिकवतो त्याला कसं मागे टाकता येईल याच गमक; मात्र त्याला शिकवत नाही अव्वल येणाऱ्याचं तोंडभरून कौतुक करायला. तो गायनात ज्यावेळी भाग घेतो तेव्हा आपण त्याला तू उत्तम गा असं शिकवतो; पण त्याचवेळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या इतरांचही गाणं तितकंच मनापासून ऐक असं सांगायला मात्र विसरूनच जातो. तो उत्तम खेळाडू व्हावा म्हणून त्याच्या आहारापासून सरावापर्यंत आपण मेहनत घेतो; पण संघ म्हणून खेळताना तुझ्यासारखाच सगळ्याचा खेळ उत्तम व्हावा यासाठी प्रयत्न करत जा; हे आपण त्याला शिकवतच नाही. क्षेत्र कोणतंही असो फक्त तोच यशस्वी व्हावा हेच आपण त्याला शिकवतो.. पण कधीतरी हरताही यायला हवं हे मात्र त्याला सांगत नाही. यश कसं मिळवायचं असतं हे ही शिकवतो; पण यश कसं मिळवायचं नसंत हे मात्र शिकवायचं आपण विसरूनच जातो. त्याला अव्वल बनो वा ना बनो; मात्र तो चांगला माणूस बनायला हवा हे शिकवणं खूप गरजेचं असतं हे सांगायला मात्र आपण विसरूनच जातो. यामुळे कदाचित तो यशस्वी आणि महत्वाकांक्षी जरूर बनेल पण उत्तम नागरिक बनेलच हेही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.

शाळेमध्ये शिक्षकांनाही अभ्यासात अव्वल असलेल्या मुलांचं खूप कौतुक असतं. गुरुजींची शाबासकी आपल्यालाच मिळावी म्हणून गुरुजींच्या पुढे मागे फिरून त्यांचा आवडता विद्यार्थी बनण्यासाठी काही मुलं सातत्याने धडपड करताना दिसून येतात. गुरुजनांचा आदर करायलाच हवा; पण कदर व्हावी म्हणून आदर करण्याची वृत्ती मुलांत बाळगू नये याची दक्षता त्यावेळी बहुतेकदा शिक्षकही घेत नाहीत. अशी वृत्ती बाळगणारा भविष्यात स्वतंत्र विचार बाळगेल याबद्दल खात्री देता येत नाही. याउलट अभ्यासात हुशार नसलेला पण सहकार्य वृत्ती जोपासणारा, मैदानाच्या स्वच्छतेपासून वर्गाच्या सफाईसाठी श्रम घेणारा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नियोजन करणारा, उत्कृष्ट संघ व्यवस्थापन करणारा, विविध कलागुणात निपुण असणारा अभ्यासात “ढ” म्हणून ओळखला जाणारा पण चौफेर व्यक्तीमत्वाचा विद्यार्थी मात्र गुरुजींच्या नजरेत भरत नाही. उलट त्याच्या अशा सहकार्य वृत्तीला आणि समर्पण कार्याला “शाळेचे कार्यकर्ते” अशा संबोधानं कधीकधी त्याचा उपहासही होतो. शाळेमध्ये मुलांच्या वेगवेगळ्या गुणांचा सन्मान होतो; मात्र समर्पण आणि सेवाभावाचा सत्कार करणाऱ्या शाळा क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे अशा मुलांचा उत्साह लहान वयातच कोमेजून जातो; अशी मुलेही त्या कोरड्या शाबासकीच्या मोहात कधी अडकून पडत नाहीत; आणि हुशार समजली जाणारी मुलेही आपल्या यशाच्या व्यवहारिकतेतून बाहेर पडत नाही. उलट अशा चौफेर मुलांच्या हालचालींना आणि त्यांच्या गुणांना पालक आणि शिक्षकांच्या नजरेत ‘नसते उपद्व्याप’ अशा संबोधानं दुर्लक्षित मात्र केल्या जात. म्हणून मुले शाळेत नागरिकशास्त्र जरूर शिकतात; पण नागरिक बनतात का ? हे मात्र ठामपणे सांगता येत नाही. आपली यशाची रेष सर्वात मोठी करण्यासाठी इतरांच्या रेषेला धक्का लावू नये; याही पुढे जाऊन अशा रेषेमध्ये एकमेकांशी स्पर्धा करणंच कसं चूक आहे, हे शिकवायला मात्र आपण अनेकदा कमी पडतो. त्यामुळेच की काय द्वेष, ईर्ष्या, मत्सर, अहंकार, आत्मभिमान हे दुर्गुण गुणवंत समजल्या जाणाऱ्या मुलांमध्येच जास्त पाहायला मिळतात. इतरांचं कौतुक ऐकायला अशा मुलांना त्रास होताना दिसतो आणि या असल्या आत्मप्रौढी वाढवणाऱ्या स्पर्धांना खतपाणी घालायला आई बाप म्हणून आपणही कमी पडत नाही. वर्गात सगळे नापास होवोत वा पास होवोत त्या सगळ्यामध्ये केवळ मीच कसा बेस्ट असेल; ही लालसाच त्याला इतरांचा आदर करायला, माणूस म्हणून इतरांचा विचार करायला शिकवत नाही. मी हुशार आहे म्हणून आय पी एस होणार असेल तर माझे सोबती “ढ” का असेनात पण किमान हवालदार तरी व्हावेत, असं शिकवणारी शाळा आणि पालक स्वबरोबर समाजाचा उद्धार करणारे राष्ट्रनिर्माते घडवत असते. गुणवंतांचा समाज घडवण्यासाठी या गोष्टी किती महत्वाच्या असतात; हे मात्र आपण कधी शिकवत नाही.

हे न शिकवल्यामुळे आपला मुलगा वैयक्तिक आयुष्यात अपयशी नक्कीच होणार नाही;परंतु सार्वजनिक जगण्यात मात्र समाजाचा पराभव नक्की करू शकतो. समाजहित आणि राष्ट्र हितापेक्षा त्याला वैयक्तिक हित महत्वाचं वाटू लागतं. त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. भौतिक सुखाबरोबरच वेगवेगळ्या महत्वाकांक्षा हे त्याच्या आयुष्याचं ध्येय बनून जातं. यामुळेच पगारापासून ते पदोन्नतीसाठी वरिष्ठांची मर्जी राखताना तो कामातले मूल्य सांभाळेल की नाही याबद्दल ठामपणे सांगण कठीण होऊन जातं. इतरांचं मूल्य नि महत्व न जाणण्याच्या या उपजत संस्कारामुळे आपल्या वैयक्तिक वृद्धी आणि समृद्धीसाठी तो इतरांच्या हाणीचा विचार करत नाही. स्वतःची कातडी अधिक मुलायम करण्यासाठी कित्येकांची चामडी सोलायला त्याला मुळीच कसूर वाटत नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या स्वरूपाच्या भ्रष्टाचाराची दर्शने आपोआप त्याच्या वर्तनात दिसायला लागतात. त्याला लहानपनी अव्वल यायला शिकवलेला धडा तो इथेही गिरवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीत उपयोगिता हेच त्याचं अंतिम ध्येय समजून तो काम करु लागतो. मग तो कितीही उच्चपदस्थ अधिकारी झाला तर तो अधिकाराला अहंम बनवु शकतो, राजकारणी झाला तर अनैतिकतेला विजयाचं गमक ठरवु शकतो. मोठा उद्योजक झाला तर गुणवत्तेपेक्षा फायदा हेच त्याचं सूत्र राहु शकतं. जर डॉक्टर झाला तर सेवेपेक्षा मेवेगिरीला महत्व देईल; त्यातून आरोग्यातली विषमता तयार होऊन सामाजिक आरोग्य धोक्यात आणू शकतो. अभियंता झाला तर कामापेक्षा दामाची पूजा होईल; त्यातुन सार्वजनिक मूलभूत सुविधांचा फज्जा उडवू शकतो. आणि असे सर्व मेरिट लोक मिळून एकत्र व्यवस्था चालवायला निघाले तर स्वतःला अव्वल ठेवण्याच्या धडपडीत हेच गुणिजन आपापल्या सोयीने या समाजाच किंवा राष्ट्राचं शोषण करतील… त्यामुळे कदाचित भौतिक सुखसोयीमध्ये ते लोळताना दिसतील; पण समाधानाची निद्रा त्यांना उपभोगता येईल की नाही हे सांगता येणार नाही.

म्हणून प्रत्येक बापाने आपल्या मुलाला अगोदर चांगला माणूस बनायला शिकवायला हवं. यशाचा निकोप आनंद घ्यायला शिकवायला हवं. अभ्यासाबरोबरच समाज आणि राष्ट्रभक्तीची बीजे त्याच्या मनात रुजवायला हवीत. स्वतःवर प्रेम करताना आपण ज्या समाजासोबत राहतो त्याच्यावर देखील प्रेम करायला शिकवायला हवं. तो तेंडुलकर जरी नाही बनू शकला तरी त्याला आयुष्य खेळाडूवृत्तीने खेळणारा खेळाडू बनवायला हवं. नेत्यापुढाऱ्यांची, विद्वान गुणिजनांची, प्रतिमा प्रतिभांची एकवेळ आग्रहाने खुशामत केली नाही तरी चालेल; पण आपल्या रोजच्या जगण्यात आनंद भरणारे आपले मित्र, कुटूंबीय, गुरुजन यांचा सन्मान करायला त्याला शिकवावं लागेल. याचबरोबर अगदी शाळेची सफाई करणारा शिपाई असो की मग गल्लीतले गटार काढणारा भंगी प्रत्येकाच्या कामाचं मोल करायला त्याला शिकवावं लागेल. पैसा हे जगण्याचं साधन आहे; तर प्रतिष्ठा एक मृगजळी आभास, स्वतःबरोबरच समाजाचा जे उद्धार करतं ते असतं खरं यश ही यशाची व्याख्या त्याला पटवून सांगता यातला हवी. आइन्स्टाइनसारखा त्याला नवा शोध लावला आला नाही म्हणून; नाराज होण्यापेक्षा ‘स्वतःला शोधता येणं’ हा खरा आविष्कार असतो, हे त्याला पटवून सांगाव लागणार आहे. अव्वल येण्यासाठीही समाज सोबत असावाच लागतो हे ज्यादिवशी त्याला कळेल, त्यादिवशी तो यशस्वी होत असताना समाजाला मुळीच विसरणार नाही.. जर प्रत्येक बापानं आपल्या मुलाकडुन एवढया जरी अपेक्षा ठेवुन त्याल्या घडवलं, तरी भविष्यात नवं राष्ट्रनिर्माण झाल्याशिवाय राहणार नाही..!

तो खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा सन्मान असेल…!

अपराजित योध्दा
लेखक- दादासाहेब श्रीकिसन थेटे
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *