विशेष लेख : झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला..!

सध्या सोशल मीडियाचा जमाना असला तरी पत्रे ही नेहमीच हृदयाचा ठाव घेत असतात. असेच एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे नुकतेच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले हे ते पत्र आहे. सध्या काम, काम आणि काम हे बाजूला ठेवून काळजी घ्या असे सांगणारे हे पत्र नक्कीच आपल्याला देखील आवडेल

नक्की काय आहे पत्रात..!

प्रति,
आदरणीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब,

साहेब, आपण ठणठणीत असाल, ही खात्री आहे. परवा अचानक आपण कोरोना बाधित झाले असल्याचे समजले नि छातीत सुरवातीला धस्स झाले. पण पुढच्याच क्षणाला गेल्या वर्षभरातील सर्व लेखाजोखा समोर आला. कोरोनाचे संकट आल्यापासून जवळपास वर्षभर निधड्या छातीने ते आपण झेलले, नुसते झेलले नाही तर आपल्या छत्रछायेखाली लाखो लोकांना आपण तारले देखील.

हातावर पोट असणाऱ्या समाजातील शेवटच्या घटकापासून अगदी परप्रांतीय मजूर, स्थलांतरित होणारे जत्थे, किराणा संपला आणि पैसे नाहीत म्हणून आश्रित झालेले हजारो कुटुंबे, असे किती नि कोणते, या सर्वांना आपण अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या काळात जपले. त्यांना अन्न पुरवले, किराणा-धान्य पुरवले, स्थलांतरित नागरिकांना, परप्रांतीय नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे पासून इतर अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. त्या प्रत्येक निराधाराला कुटुंबप्रमुख म्हणून खंबीर आधार दिलात. दिल्लीत अडकवलेल्या मराठी मुलांसाठी आपले निवासस्थान सेफ हाऊसच झाले.

दरम्यान कोविड योद्धे असणारे पोलीस, पत्रकार, डॉक्टर यांच्या स्वतः आपण तपासण्या करून सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या सोबतच विकासाच्या कामांकडे देखील कानाडोळा न करता कल्याणच्या जनतेसाठी महत्त्वाचा असणारा पत्री पूल देखील आपण स्वतः मैदानात उतरून पूर्ण करून घेतला. कित्येक रस्ते मार्गी लावले. भिवंडी – कल्याण – शिळफाटा रस्त्याला सुरू असणारी कामे आवाक्यात आणली. खरच बिनधास्तपणे या कोरोनाच्या कठीण काळात देखील आपण स्वतः सर्वांच्या पुढे होऊन प्रत्येक आघाडीवर राबत होतात.

वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून देखील अचाट काम सुरू आहे. मुंबई-ठाणे पलीकडे नाशिक, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद या कक्षा रुंदावत आहेत. आपण फक्त रुग्णसेवा महत्वाची; बाकी मतदार, क्षेत्र, जात-पात, धर्म सगळे सगळे गौण असल्याचे या सेवेतून दाखवत आहात. सगळे जग थांबलेले असताना आपण ह्याही मार्गातून धावत होतात. उत्तम, सर्वोत्तम करण्यासाठी अविरत कष्ट घेत आहात. ते सगळे सगळे या छोट्याश्या लेखात सामावणार देखील नाही, आपलं इतकं व्यापक काम अनेक क्षेत्रात सुरू आहे.

त्यामुळे आपल्याला लाखो लोकांचे फोन, मेसेज, सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो संदेश आले असतील, कित्येक आमच्यासारख्या लोकांनी देवांना साकडे देखील घातले असतील, कित्येकांनी मनोमनी प्रार्थना केली असेल म्हणूनच आता सध्या आपण फक्त आराम करावा, जो आपण करत नसणारच.. फोन वरून सगळी कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असालच म्हणून हा खऱ्या अर्थाने पत्रलेख प्रपंच..! थोडा आराम करा, हे सांगण्यासाठी..

आपल्यासारखा व्यक्ती आमच्यासारख्या नागरिकांचा कर्णधार असल्याने; आमच्यासाठी ते अभिमानास्पद असेच आहे.! तूर्तास काळजी घ्या..!

कायम आपलाच,
प्राजक्त झावरे पाटील, कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *