प्रति,
संजय राऊत
कंपाऊंडर, मातोश्री
तथा
कारकून , सामना
साष्टांग नमस्कार,
आपले आजचे पत्र वाचनात आले. ते डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन संदर्भातले.. तसा तुमचा पत्राचाळीतून थेट पत्रा पर्यंतच आजचा प्रवास थक्क करणारा आहे.. विशेष म्हणजे या पत्रातून जणू फाउंडेशनने केलेल्या कामांची जंत्रीच तशी आपण मांडली. या यादीत मध्ये मध्ये मसालेदार आकड्यांची थोडी थोडी फोडणी तुम्ही दिलीत..! आणि शेवटी आकडा ही फोडलात… तब्बल “ ५०० कोटींचा”
राऊत साहेब,
वसुली करणाऱ्यांना वसुली सोडून तसेही दुसरे काही सुचते असे नाहीच. त्यामुळे वसुली आणि भ्रष्टाचार याबाबत आपण बोललात त्याबद्दल तसे विशेष असे काहीच नाही..! विशेष याचं की डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनने केलेल्या कामांची स्तुती तुम्ही केलीत. आणि हो राऊत जी ते खरच आहे..! खरच…!
हात नसलेल्या भावाला हात मिळाल्यामुळे आनंद झालेल्या बहिणीच्या डोळ्यातील आनंदश्रू पाहिलेत का तुम्ही कधी कंपाऊंडर राऊत .? हृदयाला छिद्र असणाऱ्या आपल्या बाळाला मरणाच्या दारातून बाहेर आलेले पाहताना आईपण डोळ्यांत थिजलेले तुम्ही कधी पाहिलात का कंपाऊंडर राऊत ? वृद्ध बायकोच्या यशस्वी ऑपरेशन नंतर वृद्ध नवऱ्याच्या डोळ्यातील तृप्तेची चमक तुम्ही कधी पाहिलीत का कंपाऊंडर राऊत..? शाळेची फी भरल्याने मुलांच्या डोळ्यात उभी राहिलेली स्वप्न तुम्ही कधी पहिलीत का राऊत..? इर्शाळवाडीतील आपल्या आप्तांच्या जाण्याने उद्विग्न झालेली सैरभेर माणसे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्या डोळ्यातील आपलेपणा तुम्ही कधी पाहिलात का राऊत? सणासुदीला गावी गेलेल्या नातवंडाना पाहून आजीच्या डोळ्यातील आनंदाला तुम्ही कधी पाहिलात का राऊत?
अशी देण्यासारखी लाखो नाही कोटी उदाहरणे आहेत. आपल्याकडे असे चांगले एखादे जरी काम असेल तर आठवणीने सांगा राऊत राव.. कमीत कमी समाजातील दुःख कमी करण्यासाठी दिवस रात्र धडपडणाऱ्या खूप संस्था आहेत, त्यांना तरी सोडा..
चला ते घोटाळा वगैरे वगैरे राहू द्या.. ते तुम्ही बोललात तेंव्हाच त्या घोटाळ्याची पत कळली..! लोकांच्या आनंदाचे कधीतरी कारण व्हा , इतक्याच अपेक्षेने..!
– पूर्व पाटील , पुणे