भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं

नागपूर : नागपूरमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपावर कौतुकाचा वर्षाव करतानाच विरोधी पक्षांवर निशाणा साधला. राज्यामधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडल्याचा फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये संदर्भ दिला. इतर पक्ष फुटण्यामागे आत्मकेंद्री तसेच स्वार्थी नेते कारणीभूत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला. 

जगातील सर्वात मोठा पक्ष

फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा उल्लेख केला. “आज भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. जगात सर्वाधिक सदस्य असलेला हा राजकीय पक्ष आहे. भारतातील सर्वाधिक खासदार, आमदार, महापौर, विधानपरिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यही भाजपाचेच आहेत,” असं म्हणत फडणवीस यांनी आपला पक्ष राज्यसाभ लोकसभेपासून तळागाळापर्यंत पोहोचल्याचं सूचित केलं. इतक्यावरच न थांबता फडणवीस यांनी भाजपा हा देशातील एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये कधी फूट पडली नाही असंही म्हटलं.

भाजपात कधीही फूट पडली नाही, तर काँग्रेसमध्ये असंख्य वेळा हे घडलं

“देशाच्या इतिहासामध्ये भाजपा हा एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे ज्यामध्ये कधीच फूट पडली नाही. देशातील प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली,” असं फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसमध्ये असंख्यवेळा फूट पडल्याचं नमूद केलं. “काँग्रेसच्या तर इथक्या काँग्रेस झाल्या की आता त्या मोजताही येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली. समाजवादी पक्षामध्येही एवढी फूट पडली की आता मोजायचं झाल्यास वेळ कमी पडेल.

मात्र भाजपा हा एकमेव पक्ष आहे ज्यात सुरुवातीपासून आजपर्यंत कधीही फूट पडलेली नाही. हा पक्ष कायमच एकसंघ राहिला आहे,” असं फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अधोरेखित केलं. पुढे बोलताना फडणवीस यांनी भाजपामध्ये आजपर्यंत कधीच फूट का पडली नाही यासंदर्भातील कारणाचाही खुलासा केला.

भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही

भाजपामध्ये फूट न पडण्यामागील कारणाबद्दल बोलताना फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांचं कौतुक केलं. या पक्षाचा एक विचार असून त्या विचाराशी आतापर्यंतचे सर्वच नेते या विचाराशी प्रमाणिक राहिल्याचं फडणवीसांनी नमूद केलं. “भाजपामध्ये कधीच फूट न पडण्याचं एकमेव कारण म्हणजे पक्षाचे नेते. हे नेते कधीच आत्मकेंद्री नव्हते. त्यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही.

या पक्षाचे कार्यकर्तेही कधीच स्वार्थी नव्हते. कोणाला पंतप्रधान बनवण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी किंवा कुणाला सत्ता मिळवून देण्यासाठी हा पक्ष तयार झालेला नाही. एका विचारातून या पक्षाचा जन्म झाला आहे,” असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या या विधानावरुन आगामी काळात प्रतिक्रिया उमटतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *