नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे एकूण २४ प्रकल्प आहेत. यात सर्व धरणांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच नाशिकमधील गंगापूर धरणातही अवघा ४७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात देखील पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, देवळा, मालेगाव, बागलाण या ७ तालुक्यांमध्ये २०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. पुढील काळात टँकरची संख्या देखील वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आहे.
नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील छोट्या-मोठ्या धरणात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. मात्र प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे या आदिवासी नागरिकांवर दरवर्षी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केला आहे.
मागच्या वर्षी अल नीनो या वादळामुळे महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा एक मोठा आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असताना प्रशासनाकडून योग्य नियोजनाची मागणी होत आहे.