उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश.

नाशिक : नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेने एक मोठा धक्का दिला आहे. शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात आपल्या उपनेतेपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा ठाकरेंकडे राजीनामा दिला होता.

 

मात्र आज बबनराव घोलप यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेत दिली आहे. घोलप यांचा आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का समजला जातो आहे.

दरम्यान, माजी मंत्री बबनराव घोलप हे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी ठाकरेंच्या सेनेकडून इच्छुक होते. ऐनवेळी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे शिर्डीची जागा ही ठाकरेंच्या सेनेने महाविकास आघाडी कडून लढवावी अशी भूमिका घेत वाकचौरे यांना शिर्डी लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर बबनराव घोलप यांचा पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले.

 

घोलप हे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवणार अशा चर्चा होत्या मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न होऊ देण्यासाठी खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी प्रयत्न केल्याचा थेट आरोप बबनराव घोलप यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

 

घोलप हे मागील ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कडवट शिवसैनिक म्हणून घोलप यांची मोठी ताकद नाशिकमध्ये पाहायला मिळत होती. मात्र बबनराव घोलप यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने एक मोठा धक्का ठाकरे यांच्या शिवसेनाला बसणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

 

 

बबनराव घोलप यांनी नाशिक मध्ये देवळाली विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा विजय मिळवत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवला होता. त्यानंतर बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप हे देखील देवळाली मतदारसंघातून निवडून आलेले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बबनराव घोलप यांची एक मोठी ताकत शिवसेनेच्या पाठीशी होती.

 

घोलप यांनी आज चार वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बबनराव घोलप यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे महायुतीच्या उमेदवारांना एक मोठी ताकद मिळू शकते अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

 

घोलप यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेतील नाशिक मधील माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे नाशिक हा ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे या ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला बबनराव घोलप यांच्या सोडचिठ्ठीने मोठे खिंडार पडणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

बबनराव घोलप यांची नाशिकमधील ताकद


देवळाली विधानसभा मतदारसंघात पाच वेळा घोलप हे निवडून आले आहेत. भगूर नगरपरिषद,देवळाली, शिर्डी, नाशिक शहर आणि ग्रामीण भागात घोलप यांची एक मोठी शिवसैनिकांची फळी उभी आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नाशिक रोड, जेलरोड या भागात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी बबनराव घोलप यांचा मोठा वाटा आहे.

 

सिन्नर विधानसभा मतदारसंघात बाजार समिती, नगरपरिषद येथे शिवसेनेची ताकत वाढवण्यासाठी घोलप यांनी प्रयत्न केले आहे. बबनराव घोलप हे चांभार समाजाचे असल्याने नाशिकमधील जातीय राजकारणात बबनराव घोलप यांची मोठी ताकद पाहायला मिळते.

 

 

 

बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम करणारे नाशिकमधील शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांसाठी बबनराव घोलप यांच्यासह शिंदें सोबत जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

बबनराव घोलप यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर एकनाथ शिंदे हे काम करत असल्याने शिंदें सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता घोलप यांच्या जाण्याने उद्धव सेनेला नाशिकमध्ये किती फटका बसू शकतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *