उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर..! ‘ या ‘ कार्यक्रमासाठी येणार एकत्र..!

| मुंबई | शिवाजी पार्क, काळा घोडा, रिगल सिनेमा की गेट वे ऑफ इंडिया अशा तीन ते चार स्थळांची चाचपणी झाल्यानंतर अखेरीस गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी, २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दीर्घकाळानंतर हे नेते एकत्र येत असल्याने राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्ये मतभेद होते. दरम्यानच्या काळात जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. परंतु हा प्रस्तावही बारगळला. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. तसा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला.

दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या या भागात पुतळा उभारू नये, अशी मागणी दक्षिण मुंबईतील एका रहिवासी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. पुतळ्यामुळे येथील वाहतूककोंडीत आणखी वाढ होईल, असे संघटनेने म्हटले होते. मात्र सेनेने हे फार गांभीर्याने न घेता अखेर याच ठिकाणी पुतळा उभारला आहे. या पुतळ्यासाठी सर्व सरकारी परवानग्या घेऊन काम पूर्ण केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर व नगरसेवक सचिन पडवळ यांनी पवार, राज, फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांना अनावरण सोहळ्याची निमंत्रणे मंगळवारी त्यांच्या घरी जाऊन दिली. या कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नऊ फूट उंच पुतळा :

पुतळ्याची निर्मिती व उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या सौजन्याने करण्यात आली आहे. नऊ फूट उंचीचा हा पुतळा असून शाडूची माती आणि ब्रॉन्झ धातूपासून साकारण्यात आला आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *