उंबार्ली येथील पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे

| कल्याण / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही आपली संस्कृती पूर्वीपासून आहे. सध्या निसर्गाचे जतन करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत आहेत. कल्याण ग्रामीण मधील श्री संत सावळाराम महाराज वनश्री धामटाण, भाल, दावडी, सोनारपाडा, उंबार्ली येथील वनविभागाच्या जागा अशीच आहे. आज त्या ठिकाणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली.

या ठिकाणचे वातावरण पक्ष्यांना पोषक असून या जागेवर मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांचा अधीवास असल्यामुळे पक्षी अभयारण्य म्हणूनच हे ओळखले जात आहे. या पक्षी अभयारण्याला शासन दरबारी मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असून या अभयारण्याचा अधिक प्रमाणात विकास करता येईल, यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.

उन्हाळ्यामध्ये येथील पक्ष्यांची तहान भागावी व त्यांना पाण्याची सोय व्हावी याकरिता यापूर्वीच या पक्षी अभयारण्यात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बसविण्यात आल्या आहेत. आता पावसाळा सुरु झाला असून जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करुन ते अडवून पाणी संवर्धन करण्याच्या दृष्टिने दोन बंधारे बांधण्याच्या तसेच येथे अस्तित्वात असलेला बंधाऱ्यातून पाणी झिरपत असल्याने त्याची डागडूजी करण्याच्या सूचना यावेळी केल्या. या जागेवर अधिक वृक्ष लागवड करणे तसेच येथील पक्षी व वृक्षांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या अभयारण्याला संरक्षक भिंत बांधण्याबाबत सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *