| वसई विरार | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई विरारमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याचे दिसत आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ठाकूर कुटुंबासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
पंकज देशमुख यांनी सोशल मीडियावर टाकत बहुजन विकास आघाडीला जाहीर अलविदा केला. देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बविआला धक्का बसून शिवसेनेला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत पंकज देशमुख?
पंकज देशमुख हे बहुजन विकास आघाडीचे माजी उपमहापौर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नातेवाईक आहेत. तर माजी सभापती निलेश देशमुख यांचे चुलतभाऊ आहेत. पंकज देशमुख यांचे नालासोपारा शहरात युवा कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी बविआला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट?
“गेल्या एक दशकाहून अधिक काळ समाजकारणाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्ष परिवारात हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील, उमेश नाईक, क्षितीज ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. या पक्षात संपूर्ण क्षमतेने कार्य करण्याची बहुमोल संधी मला दिल्याबद्दल पक्षनेतृत्व, सर्व जेष्ठ नेतेमंडळी, नगरसेवक आणि सहकार्य केल्याबद्दल सर्व आजी माजी महिला, पुरुष व युवा पदाधिकारी, सहकारी, हितचिंतक मित्र परिवार आणि वेळोवेळी तसेच कठीणसमयी भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शनरुपी राजकीय साथ दिलेल्या कुटूंबियांचे शतशः जाहीर आभार.
सदर कार्यकाळात कळत नकळत माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची मनःपूर्वक क्षमा मागतो. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून व्यक्तिगत जीवनात आपले प्रेम, नातेसंबंध, आपुलकी यापुढेही अशीच कायम राहील.
-पंकज देशमुख