| मुंबई | हा फोटो नीट पाहा. हा फोटो आहे अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राळेगणसिद्धीतल्या प्रेस कॉन्फरन्सचा. ही प्रेस कॉन्फरन्स दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 जानेवारीला सायंकाळी पार पडली होती. अण्णांची मनधरणी करण्यात आणि त्यांचं शेतकऱ्यांसाठी होऊ घातलेलं उपोषण मोडीत काढण्यात फडणवीसांना यश आलं. बातमी त्याचीच झाली. पण गेल्या दोन दिवसात याच प्रेस कॉन्फरन्सचा हा फोटोही तेवढाच चर्चेत आहे. का?
ह्या फोटोत नेमकं काय आहे?
महाराष्ट्रभर ज्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे त्यात नेमकं काय आहे? या फोटोत देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या बाजुला अण्णा हजारे आहेत आणि त्यांच्या बाजुला केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आहेत. ह्या तीन मोठ्या नेत्यांसोबत फोटोत उभे असलेले दिसतायत ते नगरचे बडे नेते आणि एकेकाळी काँग्रेसचे एक नंबरचे नेते राधाकृष्ण विखे पाटील. याचाच अर्थ फोटोत चार मोठे नेते आहेत पण चर्चा आहे ती फक्त विखे पाटलांची. चर्चेचं कारण आहे ती खुर्ची.
विखे पाटलांना बसायलाही जागा नाही?
फोटोत अण्णा बसलेले आहेत, फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बसलेले आहेत पण उभे दिसतायत ते फक्त राधाकृष्ण विखे पाटील. त्यांच्यासाठी खुर्चीही ठेवली गेली नसल्याचं फोटोत स्पष्ट दिसतय. काही कार्यकर्त्यांचा गोतावळाही फोटोत आहे. त्यात विखे पाटीलही उभे आहेत. अनेकांनी टीव्हीवरही हे दृश्यं पाहिलं, त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केलेत. खुद्द फडणवीसांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यात विखे पाटील पाठीमागे उभे असून ते स्वत:चा मोबाईलमध्ये काही तरी चाळत असल्याचं दिसतंय. फडणवीस-अण्णांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विखे पाटलांना साधी बसायला जागा नाही अशी टिप्पणी सोशल मीडियावर फोटोसह केली जात आहे.
काँग्रेसमध्ये विखेंचा अपमान तर मग भाजपात काय?
राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असताना पक्षाचे राज्यातले नंबर एकचे नेते होते. विधानसभेत त्यांना पक्षानं विरोधी पक्ष नेते केलं. त्या पदावर असतानाच विखेंनी थेट भाजपात प्रवेश केला. एखाद्या विरोधी पक्ष नेत्यानंच थेट भाजपात प्रवेश करण्याची ही विरळ घटना. काँग्रेस सोडताना, पक्षानं आपला खूप अपमान केल्याचं वक्तव्य विखेंनी केली होतं. त्यावरुनच आता विखेंना भाजपात फार मान मिळतोय का अशा स्वरुपाची टीका टिप्पणी सोशल मीडियावर केली जात आहे. त्यासाठी हा फोटो वापरला जातोय.
विखेंचं भाजपात स्थान कुठे?
राधाकृष्ण विखे पाटील हे नगरचं बडं प्रस्थ. आता ते काँग्रेसमध्ये असते तर कदाचित बाळासाहेब थोरातांच्या जागी तेच दिसले असते. पण त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला आणि स्वत:ची अशी अवस्था करुन घेतल्याची चर्चा आहे. अण्णांच्या मनधरणीसाठीही भाजपानं गिरीश महाजनांना दोन तीन वेळेस राळेगणसिद्धीला पाठवलं. विखेही एखाद वेळेस भेटले पण भाजपचा जास्त विश्वास महाजनांवर दिसून आला. विखे नगरचे असूनही त्यांना ह्या सगळ्या चर्चेत फार स्थान दिलं गेलं नसल्याची चर्चा आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .