पुणे : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहे. विश्वजित कदम हे पुण्यातून एकटेच राजधानी नवी दिल्लीला जाणार असले तरी दिल्लीत त्यांच्यासमवेत उमेदवार विशाल पाटील हे ही सोबत असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीमध्ये अनेक दिवसांपासून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अनेकवेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली.
मागील आठवड्यात विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली होती. परंतु तरीही समाधानकारक तोडगा न निघाल्याने विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जागा मिळत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार असल्याचे कळते.
कदम-पाटील पक्षश्रेष्ठींच्या भेटीला
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम हे पुण्यावरून खासगी विमानाने दुपारी १२ च्या सुमारास नवी दिल्लीकडे रवाना झाले. त्यापाठोपाठ खासगी विमानानेच विशाल पाटीलही जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या भेटीची वेळ उभय नेत्यांनी मागितली आहे. शुक्रवारी रात्री सांगलीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होऊन खरगे पाटील आणि कदम यांना पुढील आदेश देतील, अशी माहिती आहे.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक
शिवसेना नेते संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांचे नाव न घेता ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात त्यांच्यावर टीका केली होती. सांगलीतील काही नेते भाजपला मदत व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर केला होता. राऊतांच्या टीकेनंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढवत असताना राऊत यांचे आरोप योग्य नसल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या हातची भिवंडी गेली!
राज्यातील भिंवडी आणि मुंबईतील आणखी एक जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ नेत्यांची धडपड काही दिवसांपासून सुरू होती. यासाठी बैठकी, भेटीगाठी आणि इतर प्रयत्न सुरू असतानाच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट भिवंडीसाठी उमेदवाराची घोषणा केली. या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली.