क्या बात..! आता आपले सामान घरून थेट पोहचणार रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यात, अशी आहे रेल्वेची नवी सेवा..

| नवी दिल्ली | तुम्ही नेहमी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सामान्यपणे ट्रेनने प्रवास करताना सामान घरापासून ट्रेनपर्यंत नेण्यात बरेच कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता सामान ट्रेनपर्यंत नेण्याची जबाबदारीही रेल्वेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने आता प्रवाशांचं सामान थेट घरापासून ट्रेनपर्यंत पोहचण्याची सेवा देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्हेशन करुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं सामन थेट त्यांच्या सीटपर्यंत नेऊन देण्याची सेवा भारतीय रेल्वेने सुरु केली आहे. या सेवेचा लाभ ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. म्हणजेच अगदी मोबाईलवरुनही या सेवेसाठी प्रवासी अर्ज करुन आपला प्रवास अधिक सुखकर करु शकतात. ही सेवा सुरु करताना दर प्रवाशांना परवडणारे असतील आणि सामानही सुरक्षित राहील यांची विशेष काळजी घेण्यात आलीय.

विशेष बाब म्हणजे केवळ प्रवासामधील सामानच नाही तर एखादी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून पार्सल म्हणून पाठवायची असल्यास ही सेवा वापरात येणार आहे. भारतीय रेल्वेने सुरु केलेली ही सेवा सध्या अहमदाबाद विभागामध्ये पायलेट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage च्या अ‍ॅपच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

वेबसाईट किंवा अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना आपल्या रेल्वे आरक्षासंदर्भातील माहिती आणि सामानासंदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे. ट्रेन निघण्याच्या चार ते पाच तास आधी प्रवाशांच्या घरुन सामान घेतलं जाईल आणि ते थेट त्यांच्या सीटपर्यंत पोहचवण्यात येईल. या सेवेसाठी सामानाचा आकार आणि वजनावरआधारीत शुल्क द्यावे लागणार आहे. ५० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत शुल्क या सेवेसाठी आकरण्यात येईल.

या सेवेमध्ये सुरक्षेची हमी देण्यासाठी विमानतळांवरील सामानाप्रमाणे प्रवाशांच्या समानावर बारकोड स्टीकर लावले जाणार आहेत. हे बारकोड स्कॅन करुन प्रवाशांना सामान नक्की कुठे आहे यासंदर्भातील माहिती थेट मोबाईल मिळणार आहे. हे सामान पोहचवताना कोरोनाच्या कालावधीमध्ये सामानाच्या सॅनिटायझेशनची आणि स्वच्छतेचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे. या सेवेसाठी रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील हमालांनाही सहभागी करुन घेतलं आहे. त्यामुळे या हमालांनाही या सेवेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या अहमबादाबादमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु असून प्रवाशांचा याला चांगला प्रतिकास मिळत आहे. या सेवेच्या माध्यमातून रेल्वेलाही आर्थिक फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *