शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

शिवसेना शिंदे गटाचा हिंगोली येथे जाहीर झालेला उमेदवार रद्द करावा लागल्यानंतर आता शिंदे गटाने उमेदवार जाहीर करताना काळजी घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. अद्याप नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि छत्रपती संभाजी नगर या मतदारसंघाठी शिंदे गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यापैकी भाजपा कोणते मतदारसंघ घेणार आणि यातील कोणत्या विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी कोणता उमेदवार निवडणूक लढविणार, याचे खात्रीशीर उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

जुन्या मित्राला शुभेच्छा देत म्हणाले…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिवसेना शिंदे गटाकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल, हा माझा विषय नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ठाणे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनाच तिकीट मिळणार, हे खात्रीने सांगतो. माझी मनापासूनची इच्छा आहे की, त्यांना तिकीट मिळावे.

ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार असलेले राजन विचारे हे सध्या उबाठा गटात आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे.

दुसरीकडे भाजपाचे नेते आणि याच मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक हेदेखील ठाणे मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ठाणे मतदारसंघ आपल्याकडे वळविण्याची दोन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. अशातच ठाण्यातून उमेदवार कोणता असणार याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.

मराठा-ओबीसी वाद पेटवणाऱ्यांना उमेदवारी

महाराष्ट्रात मागच्या सहा महिन्यात जाणूनबुजून मराठा-ओबीसी वाद पेटवला गेला. आम्ही आधीपासून सागंत होतो. ओबीसींचे एक टक्काही आरक्षण हलणार नाही. तरीही चिथावणी देणाऱ्या सभा महाराष्ट्रात घेतल्या गेल्या. आता त्यामागचे राजकारण समोर येत आहे.

ज्या छगन भुजबळांनी ओबीसी-मराठा वाद निर्माण केला, त्यांना आता नाशिकची उमेदवारी मिळत आहेत. त्यावरून त्यांचे राजकारण उघड होत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा एक राजकीय डाव असून त्याचे पंच हे छगन भुजबळ होते, हा माझा सुरुवातीपासूनचा आरोप आहे. छगन भुजबळ यांनी संपूर्ण ओबीसी समाजाला वेगळ्या दिशेला नेऊन त्यांचा महायुतीला पाठिंबा कसा मिळेल? याची खात्री बाळगली.

बाळ्यामामावरील कारवाई द्वेषातून

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवार जाहीर होताच दुसऱ्या दिवशी एमएमआरडीएकडून त्यांच्या गोदामांवर कारवाई करण्यात आली. या विषयावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणुकीच्या काळात प्रशासनाचा हस्तक्षेप करणे चुकीचे आहे.

जर गोदामाचे काम अनधिकृत होते तर इतके दिवस एमएमआरडीए इतके दिवस शांत का होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच घाबरविण्यासाठी कारवाई केली गेली का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *