यंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..!

| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने भाजपचे टोनी सिरवानी सभापतीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या कलवंतसिंग सोहता यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. रंगतदार निवडणुकीत शिवसेना काही नवीन खेळी खेळते का? याकडे उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलं होतं.

कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून दीपक उर्फ टोनी सिरवानी आणि शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहता यांनी अर्ज दाखल केले होते.

16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8, रिपाइं 1, शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यातच भाजप आणि रिपाइं एकत्र आल्यामुळे यंदा भाजपचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात होते. टोनी सिरवानी यांनी अनेक वर्ष उल्हासनगर महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे.

फोडाफोडी टाळण्याचे भाजपचे प्रयत्न

मागील निवडणुकीत समसमान संख्याबळ असताना शिवसेनेनं भाजपच्या एका सदस्याला फोडून थेट सभापती केलं होतं. त्यामुळे यंदा फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपनं आपले सदस्य अज्ञात स्थळी रवाना केले होते. यावेळी कुठलाही दगाफटका न होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्याच्या साथीने भाजपला स्थायीच्या सभापतीपदी आपला उमेदवार बसवण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *