यंदा शाळांची सुरुवात होणार ब्रिज कोर्स ने….!
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा ब्रिज कोर्स असणार आहे.
मागील शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने चालू आहेत. कोरोना महामारीमुळे मागील दिड वर्षांपासून विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नाहीत. म्हणून यंदा शाळा सुरू होताच शाळांमध्ये 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहे. मागील वर्षांतील प्रमुख संकल्पनावर आधारित हा ब्रिज कोर्स असणार आहे. चालू शैक्षणिक वर्षातील पाठयांश शिकण्यासाठी विद्यार्थी तयार व्हावेत व मागील इयत्तेतील पाठयांशाची उजळणी व्हावी या उद्देशाने हा ब्रिज कोर्स तयार करण्यात आलेला आहे.
या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रम निर्मितीसाठी राज्यातील तज्ञ शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव देणारा आणि विचाराला चालना देणारा ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती नुसार तयार करण्यात आला आहे . 15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन केले आहे.
हा ब्रिज कोर्स नेमका कसा असेल?
जर एखादा विद्यार्थी या शैक्षणिक वर्षात समजा सहावीत आहे. तर त्याच्यासाठी इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित ब्रिज कोर्स असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही अशा महत्त्वाच्या संकल्पना ब्रिज कोर्समध्ये घेण्यात आल्या आहेत.
ब्रिज कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत ?
✓ हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे.
✓ प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे.
✓ यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
✓ 45 दिवसांमध्ये एकूण तीन घटक चाचण्या होणार.
✓ पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात आहे. शाळा बंद असल्याने चौथ्या वर्गात गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात तिसऱ्या वर्गात न जाता चौथ्या वर्गात गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचा लार्निंग लॉस झाला आहे त्यादृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे.पुढील इययत्तेतील संकल्पना ह्या पूर्वज्ञानावर आधारित असतात म्हणून विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान अधिक दृढ व्हावे हा उद्देश ठेऊन SCERT ने ब्रिज कोर्स निर्मिती केली आहे.
विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी, यावर्षाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक पातळीवर तयार करण्यासाठी ब्रिज कोर्स मदत करणार आहे. तरी राज्यातील सर्वच शाळांनी हा ब्रिज कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणे अपेक्षित आहे.
– प्रवीण द. शिंदे