हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही , मनसे – सेना वाद पेटला..!

| मुंबई | राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे वाहताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी असल्या तरी सर्वच पक्षांनी देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असणाऱ्या मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून विरोधक पक्षातील आजी-माजी नेत्यांना पक्ष प्रवेश देण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवबंधन हातात बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच बोरिवलीचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनाही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर हातात शिवबंधन बांधून मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मेहता यांच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची माहिती देणारे बॅनर बोरिवलीमध्ये अनेक ठिकाणी झळकले. मात्र आता या बॅनर्सवरुन शिवसेना आणि मनसे आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे.

मेहता यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे पोस्टर बोरिवलीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी बॅनर्स लावले होते. मात्र हे बॅनर गुजराती भाषेत लावण्यात आलेले. उद्धव ठाकरे मेहता यांच्या हातात शिवबंधन बांधतानाचा फोटोही या बॅनरवर होता. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटोही या बॅनरवर लावण्यात आलेले. स्थानिक नेत्यांनी मेहता यांना शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या बॅनरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पांढऱ्या रंगाची पत्रकं चिटकवली आहेत. या पॅम्पलेटवर ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ असा मजकूर लिहून मोठ्या अक्षरामध्ये ‘मराठी’ असं लिहिण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेचा टाइमपास टोळी असा उल्लेख करण्यात आला

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेच टाइमपास टोळी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली होती. शिवसेनेकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवेसना वीरप्पन गँग असल्याची टीका केली होती. फेरीवाल्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवून खंडणी उकळण्याचं काम चालू असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य यांनी मनसेला टाइमपास टोळी म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *